लोकमत न्यूज नेटवर्कनेर : रेती वाहतुकीच्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आजंती येथील तिन्ही तरुणांच्या कुटुंबीयांना महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवून देत मदतीचा हात दिला. आजंती येथे मृतांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना ना. संजय राठोड यांनी धनादेश सुपूर्द केले.आजंती येथील घनश्याम किसन श्रृंगारे, अंकुश वसंतराव जुनघरे, राहूल रमेश काळे हे २६ आॅक्टोबर २०१७ रोजी गावातील पाणीटंचाई निवारण्यासंदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यासाठी नेर येथे आले होते. सायंकाळी दुचाकीने गावाकडे परतताना कोहळा पुनर्वसन गावाजवळ रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. घनश्याम श्रृंगारे आणि अंकुश जनुघरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. राहूल काळे याचा उपचारासाठी यवतमाळ येथे दवाखान्यात नेत असताना वाटेत मृत्यू झाला होता.महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी या तिन्ही कुटुंबांची भेट घेऊन शासनस्तरावरून सर्वतोपरी मदत देण्याची ग्वाही दिली होती. मंजूर झालेल्या रकमेच्या धनादेशाचे वितरण श्रृंगारे, जुनघरे व काळे कुटुंबियांना करण्यात आले. शासकीय योजनांच्या लाभासाठी निकषानुसार या कुटुंबांचा प्राधान्याने विचार करून त्यांना सहकार्य करण्याचे निर्देश तहसीलदारांना दिले.यावेळी ना. संजय राठोड यांच्या समवेत शिवसेना तालुका प्रमुख मनोज नाल्हे, तहसीलदार अमोल पवार, आजंतीच्या सरपंच भाग्यलक्ष्मी गणेश राठोड, जिल्हा परिषद सदस्य भरत मसराम, निखील जैत, पंचायत समिती उपसभापती समीर माहुरे, कृउबा सभापती रवींद्र राऊत, उपसभापती दिवाकर राठोड, भाऊराव ढवळे, शहर प्रमुख दीपक आडे, प्रवीण राठोड, खुशाल मिसाळ, उमेश गोळे, रूपेश गुल्हाने, नितीन कराळे, किशोर अरसोड, प्रशांत मासाळ, शाखा प्रमूख गणेश ठाकूर आदी उपस्थित होते.
आजंतीच्या ‘त्या’ कुटुंबांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 11:58 PM