कंत्राटदारासह दोन जखमी : दुचाकीचाही झाला चेंदामेंदा वणी : शहरातील टिळक चौकात असलेला हायमास्ट लाईट अचानक कोसळल्याने कंत्राटदारासह एक व्यावसायिक जखमी झाला. ही घटना बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. प्रणय पुरूषोत्तम मेश्राम (२७) रा.नागपूर व गजानन जगन्नाथ लोणारे (४५) असे जखमींचे नाव आहे. बुधवारी दुपारी टिळक चौकातील हायमास्टच्या खाली गजानन लोणारे हे झेंड्याची विक्री करीत होते, तर कंत्राटदार प्रणय मेश्राम हे हायमास्टची पाहणी करीत होते. दरम्यान अचानक आठ लाईट असलेला हायमास्ट खाली कोसळला. यात कंत्राटदाराच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली, तर गजानन लोणारे यांच्या पायाला जबर दुखापत झाली. या दोघांनाही ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या दुर्घटनेत खांबाखाली असलेल्या पल्सर दुचाकीचा चेंदामेंदा झाला. तसेच शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासभोवताल असलेल्या कठड्याचेही नुकसान झाले. नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे म्हणाले, हायमास्ट लाईट अतिशय जुना असून या घटनेची चौकशी केली जाईल. चौकशीत दोषी आढळणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल, ााहितीनुसार, सदर लाईट १९९१ मध्ये लावण्यात आला होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या देखभाल दुरूस्तीकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष होते. देखभाल दुरूस्तीचे कंत्राट नागपूर येथील एका कंत्राटदाराला देण्यात आले असून देखभाल व्यवस्थीत होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
टिळक चौकातील हायमास्ट कोसळला
By admin | Published: January 26, 2017 1:05 AM