अशोक गोडघाटे : पुसद येथे धम्मक्रांती प्रज्ञापर्वाला प्रारंभ पुसद : जगात विविध देशात क्रांती घडून आली. परंतु भारतातील क्रांती इतर देशाच्या तुलनेने अशक्य अशी असताना बाबासाहेबांनी ती निशस्त्र लढवून ती घडवून आणली. तसेच संविधानाच्या माध्यमातून सर्व राष्ट्राला समतेच्या तत्वात बांधून ठेवण्याच्या त्यांच्या कर्तृत्वाची परिचीती भारतासह जगाला झाली, असे प्रतिपादन प्रख्यात आंबेडकरी विचारवंत प्रा. अशोक गोडघाटे यांनी येथे केले. महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने आयोजित धम्मक्रांती प्रज्ञापर्वात पहिले पुष्प गुंफताना ते ‘भारतीय संविधान निर्मिती : स्वरूप आणि अपेक्षित गणराज्य’ या विषयावर बोलत होते. शुक्रवारी धम्मक्रांती प्रज्ञापर्वाला प्रारंभ झाला. उद्घाटन माजी मंत्री आमदार मनोहरराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी अॅड़ आप्पाराव मैंद होते. प्रमुख पाहुणे म्हणून महेश खडसे, जयवंतराव पाटील कामारकर, राजेश आसेगावकर, अर्जुनराव लोखंडे, फकीरराव वाढवे, गणेश पागीरे आदी उपस्थित होते. सर्व प्रथम सुजाता महिला मंडळाकडून सामुहिक बुद्धवंदना घेण्यात आली. दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या चिमुकल्यांनी ‘प्रथम नमो गौतमा’ या गीतावर नृत्य सादर केले. प्रा. गोडघाटे म्हणाले, जगात अनेक क्रांत्या झाल्या. फ्रान्सच्या राज्यक्रांतीतून स्वातंत्र्य, समता व बंधूता या मूल्यांचा उदय झाला. बाबासाहेबांनी या मूल्यांचा समावेश संविधानात केला. परंतु तो फ्रान्सच्या राज्यक्रांतीतून न घेता तथागत गौतम बुद्धांच्या तत्वातून घेतल्याचे त्यांनी सांगितले. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो सर्वप्रथम त्याविरुद्ध बंड करून उठेल ही जाणीव बाबासाहेबांनी सर्वप्रथम करून दिली. लोकांच्या जीवनात रक्ताचा एक थेंबही सांडू न देता आर्थिक, सामाजिक क्रांती बाबासाहेबांनी आपल्या कर्तृत्वाने करून दाखविली. म्हणून जगाच्या इतिहासात बाबासाहेबांनी भारतात केलेली क्रांती अभूतपूर्व होय, असे विचार त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक मिलींद हट्टेकर यांनी, संचालन प्रा. विलास भवरे यांनी तर आभार सुभाष गायकवाड यांनी मानले. (प्रतिनिधी)
जगाच्या इतिहासात बाबासाहेबांनी भारतात केलेली क्रांती अभूतपूर्व
By admin | Published: April 09, 2017 12:51 AM