लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : दिल्ली येथील शाहीन बागच्या धर्तीवर बुधवारपासून येथील आठवडीबाजार परिसरातील आरके हॉलमध्ये बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. सीएए, एनआरसी आणि एनपीआर कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी तालुक्यातील हे आंदोलन सुरू केले.प्रथम महिलांनी मूकमोर्चा काढून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली. तेथे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. त्यानंतर येथील जुन्या बसस्थानकाजवळील हॉलमध्ये धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. महिलांनी ६० मीटर लांबीचा राष्ट्रध्वज घेऊन मूक मोर्चात सहभाग नोंदविला. सीएए, एनआरसी आणि एनपीआर कायद्यामुळे संविधानाचे कलम १४ आणि १५ चे उल्लंघन झाल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे देशातील नागरिकांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांना तडा गेला. जातीजातीत भेदभाव पसरविण्याचा डाव खेळला जात आहे. संविधानाचे उल्लंघन केले जात आहे. हा कायदा आसाममध्ये लागू झाला. त्याचे परिणाम पूर्ण देशाने पाहिले. तेथील नागरिकांना नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे आम्ही या कायद्याचा विरोध करतो, असे निवेदनातून स्पष्ट करण्यात आले.दुपारी १ वाजता जुना दिग्रस मार्ग, गोळीबार चौक या प्रमुख मार्गाने तिरंगा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरात पोहोचला. तेथे मान्यवरांनी मार्गदर्शन केले. निवेदन दिल्यानंतर हा मोर्चा हॉलमध्ये पोहोचला. तेथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. या तिरंगा मूकमोर्चा आणि धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले होते. मोर्चातील राष्ट्रध्वजाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दारव्हा येथे महिलांचे बेमुदत धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 6:00 AM
प्रथम महिलांनी मूकमोर्चा काढून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली. तेथे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. त्यानंतर येथील जुन्या बसस्थानकाजवळील हॉलमध्ये धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. महिलांनी ६० मीटर लांबीचा राष्ट्रध्वज घेऊन मूक मोर्चात सहभाग नोंदविला. सीएए, एनआरसी आणि एनपीआर कायद्यामुळे संविधानाचे कलम १४ आणि १५ चे उल्लंघन झाल्याचा आरोप त्यांनी केला.
ठळक मुद्देशाहीनबाग आंदोलन : सीएए, एनआरसी, एनपीआरला विरोध, मूकमोर्चा