प्रशासन उदासीन : कित्येक वर्षापासून मागणीकडे दुर्लक्ष उमरखेड : केंद्र शासनाच्या अनुसूचित जमातीच्या यादीवर हलबा, हलबी ही जमात क्रमांक १९ वर नमूद असून, या जमातीला घटनादत्त अधिकार दिले आहेत. परंतु महाराष्ट्र राज्यात या जमातीला जात प्रमाणपत्र दिले जात नाही. आता जात प्रमाणपत्रासाठी उमरखेड तालुक्यातील हलबा-हलबी समाज आंदोलनाच्या पवित्र्यात दिसत आहे. कित्येक वर्षापासून तालुक्यातील हलबा-हलबी समाज प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे अंधाराच्या छायेत आहे. या समाजाला अद्यापही जात प्रमाणपत्र दिले जात नाही. विनाकारण प्रकरणे खारीज केली जातात. जुन्या पुसद तालुक्यात हलबी समाज १८८१ पासून वास्तव्यास आहे. उमरखेड, ढाणकी, फुलसावंगी, पुसद, धनोडा या गावांमध्ये समाजाचे वास्तव्य असल्याचे महसुली पुरावे देखील उपलब्ध आहेत. आपल्या मागण्यांसाठी हा समाज शासन दरबारी अनेक वर्षांपासून संघर्ष करीत आहे. परंतु त्याचा उपयोग होताना दिसत नाही. यामुळे समाजाच्या शैक्षणिक विकासाला बाधा पोहोचत असून, तात्काळ जात प्रमाणपत्र दिले नाही तर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा उमरखेड तालुक्यातील हलबा समाजाने दिला आहे. (शहर प्रतिनिधी)
जात प्रमाणपत्रासाठी हलबी समाज आंदोलनाच्या पवित्र्यात
By admin | Published: April 15, 2016 2:09 AM