उत्तरप्रदेशातील कारागीर : अनेकांना रोजगार यवतमाळ : होळी सण नजिक आला आहे. या सणाकरिता गाठी बनविण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी उत्तरप्रदेशातील कारागिरांनी यवतमाळात हजेरी लावली आहे. होळीचा सण येताच यवतमाळात दाखल होणाऱ्या उत्तरप्रदेशातील कारागिरांची परंपरा अद्याप कायम आहे. जवळपास ४०० क्विंटल साखरेपासून गाठी बनविण्याची प्रक्रिया यवतमाळात सुरू झाली आहे. विविध रंग, आकार आणि विविध कलेचा वापर करून गाठ्या बनविल्या जात आहे. यात फुग्याच्या आणि साखरेच्या गाठीला सर्वाधिक मागणी आहे. याच गाठ्यांची ग्रामीण भागात सर्वाधिक विक्री होते. ही गाठी यवतमाळसह चंद्रपूर व नांदेड जिल्ह्यात पोहोचली आहे. उत्तरप्रदेशातील कारागिरांनी बनविल्या गाठींना या जिल्ह्यात विशेष मागणी आहे. गाठी निर्मितीमुळे जिल्ह्यातील ८०० मजुरांना रोजगार मिळाला. महिनाभर त्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील या ८०० मजुरांना उत्तरप्रदेशातील ४०० कारागीर आर्कषक गाठी बनवून देतात. त्यानंतरची प्रक्रिया स्थानिक मजूर पार पाडतात. गाठी निर्मितीच्या उद्योगातून उत्तरप्रदेशातील कारागिरांसह एकूण १२०० जणांना रोजगार उपलब्ध झाला. त्यामुळे त्यांच्याही कुटुंबाला विविध रंगी रंगपंचमीत होळी सणाला आपल्या घरी दोन गोड घास शिजविता येणार आहे. होळीचा गोडवा आणण्यासाठी आपले घरदार सोडून परप्रांतीय कारागीर येथे राबत आहे. (शहर वार्ताहर)
परप्रांतीय कारागिरांच्या गाठीचा होळीला गोडवा
By admin | Published: February 27, 2017 12:48 AM