लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील कापसी (कोपरी) येथे पोलिओ लसीकरणादरम्यान सॅनिटायझर पाजण्यात आल्याने बारा बालकांची प्रकृती बिघडली. त्यांना यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी केलेल्या उपचारामुळे बरे झालेल्या बालकांना बुधवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
जिल्हा परिषद प्रशासनाने तत्काळ अहवाल तयार करून 24 तासांच्या आत जनसमुदाय आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशावर्कर या तिघांना सेवेतून बडतर्फ केले. तर, दोन वैद्यकीय अधिकार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. बालकांना सुरुवातीला मळमळ व उलटीचा त्रास सुरू झाला. पोलिओचा डोस सोडून सॅनिटायझर पाजल्याचे लक्षात येताच पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. या बालकांची प्रकृती आता उत्तम आहे . बालकांना घेवून सायंकाळी पालक कापसीकडे रवाना झाले.