यवतमाळ : सावकारीचा व्यवसाय करणाऱ्या महिलेने पैसे वसूल होत नसल्याने सुपारी देऊन युवकाची हत्या केली. मागावर असलेल्या मारेकऱ्यांनी त्या युवकाला कार वॉशिंग सेंटरमध्ये गाठून गोळ्या घातल्या. ही थरारक घटना शनिवारी रात्री १०:३० वाजता घडली. या प्रकरणी पोलिसांनी २४ तासांच्या आत महिला सावकारासह मारेकऱ्यांना अटक केली.
अक्षय सतीश कैथवास (वय २७, रा. इंदिरानगर, यवतमाळ) असे मृताचे नाव आहे. अक्षयच्या आईने हसीना खान ऊर्फ लक्ष्मीबाई लिल्हारे (४५) यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. हा व्यवहार व्याजासह परतफेड करून पूर्ण केला होता. मात्र त्यानंतरही सावकार महिलेकडून तगादा सुरू होता. यातूनच वाद झाला. वादादरम्यान अक्षय कैथवास याच्या आईला हसीना खान हिने जिवे मारण्याची धमकी दिली होती. शनिवारी रात्री अक्षय त्याची कार वॉशिंगसाठी घेऊन पांढरकवडा रोडवर गेला होता. मागावर असलेल्या मारेकऱ्यांनी हीच संधी साधली. अजीज दुंगे (३९), सोपान लिल्हारे या दोघांनी अक्षयवर अचानक हल्ला चढविला. अजीज दुंगे याने अक्षयच्या डोक्यात व छातीत गोळी झाडली. यात तो जागेवरच गतप्राण झाला. आरोपी तेथून चारचाकी वाहनाने पसार झाले.
दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून तपास सुरू केला. अक्षयची आई संगीता सतीश कैथवास हिने दिलेल्या तक्रारीवरून हसीना खान ऊर्फ लक्ष्मीबाई लिल्हारे, विजय लिल्हारे, गोलू लिल्हारे, खुशाल लिल्हारे, सोपान लिल्हारे, शरीफ खान, अजीज दुंगे या सात जणांविरुद्ध पोलिसांनी कलम ३०२, १२० ब, ३४, शस्त्र अधिनियम ३/२५ आणि महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ मधील कलम ३९ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिस पथकाने रात्रीतूनच सातही आरोपींना गुन्ह्यातील वाहनासह अटक केली.
पोलिस बंदोबस्तातच अंत्यसंस्कार
अक्षयच्या नातेवाइकांनी रविवारी पहाटे महिला सावकाराच्या घरावर हल्ला चढविला. तिच्या घरासमोर उभी असलेली कार जाळली. घरात असलेली दुचाकीही पेटवून दिली. या घटनेनंतर पोलिसांनी भोसा परिसरात बंदोबस्त लावला होता. सायंकाळी अक्षयच्या पार्थिवावर पोलिस बंदोबस्तातच अंत्यसंस्कार पार पडले.