लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पुसद तालुक्याच्या हुडी गावातील होम क्वारंटाईन असलेल्या ५२ वर्षीय इसमाचा मंगळवारी दुपारी संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. चार दिवसांपूर्वी सदर व्यक्ती पत्नीसह अहमदनगर जिल्ह्यातील नारायणगाव येथून चार दिवसांपूर्वी हुडी गावात आला होता. तो येहळा शेतशिवारात मुक्कामी होता. या दाम्पत्याच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का आहे. गावातील लोकांनी त्यांना पुसद येथे आरोग्य तपासणीसाठी जाण्यास सांगितले. हे जोडपे हुडी गावातून सात किलोमीटर दूर पुसदलाही मंगळवारी दुपारी पायदळच दवाखान्यात गेले. तेथून परत गावी जात असताना सायंकाळी लक्ष्मीनगरातील एका दवाखान्याजवळ गेले असता या क्वारंटाईन व्यक्तीला अचानक अस्वस्थ वाटले. ते खाली बसले आणि तेथेच या व्यक्तीचा मृत्यू झाला.डॉक्टरविना रुग्णवाहिका, एसडीओ संतापलेक्वारंटाईन व्यक्तीबाबत आरोग्य विभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर लगेच रुग्णवाहिका तेथे दाखल झाली. परंतु त्यात डॉक्टर नसल्याने पुसदचे एसडीओ डॉ. व्यंकट राठोड चांगलेच संतापले. अखेर डॉक्टर असलेल्या एसडीओंनी स्वत:च सदर व्यक्तीची तपासणी केली. तेव्हा ते मृत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी बीडीओ शिवाजी गवळी, तहसीलदार वैशाख वाहूरवार यांनीही भेटी दिल्या. आरोग्य विभागाला माहिती देऊनही एकही डॉक्टर लगेच हजर न झाल्याने सुमारे दोन तास मृतदेह रस्त्यावरच पडून होता. वृत्तलिहिस्तोवर कुणीही डॉक्टर पोहोचले नव्हते. या मृतदेहाला कुणीही हात लावायला तयार नाही. त्यासाठी आवश्यक पीपीई किट नगरपरिषदेकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.
होम क्वारंटाईन इसमाचा यवमताळ जिल्ह्यातील पुसदमध्ये संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 6:36 PM