लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दिल्लीतील डॉक्टरला सोशल मीडियाच्या माध्यमातून एका युवकाने हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढले होते. ही कारवाई ४ नोव्हेंबर २०२१ मध्ये करण्यात आली. यात डॉक्टरला एक कोटी ७२ लाख रुपये पोलिसांनी परत केले. या कारवाईची झाडाझडती अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी गुरुवारी घेतली. सकाळी १० वाजेपासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत चौकशी सुरू होती. संदेश मानकर (रा. जामनकर नगर) या युवकाने दिल्लीतील डॉक्टरशी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री केली. डाॅक्टरला भावनिक आधार देत वेळोवेळी मार्गदर्शन केले. यातून दोघांचे नाते घट्ट झाले. संदेशने बहिणीची अडचण सांगत डॉक्टरकडून एक कोटी ७२ लाख रुपये घेतले. याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे प्राप्त झाली. त्यावरून सायबर सेलने गुन्ह्याचा छडा लावत आरोपी संदेश मानकरला अटक केली. त्याच्या घरून एक कोटी ७२ लाख जप्त केले. या गुन्ह्याचा तपास यवतमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केला. जामिनावर बाहेर आल्यानंतर संदेश मानकर याने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. या प्रकरणात पोलीस कारवाईवर संशय व्यक्त करण्यात आला. याची चौकशी करण्यासाठी उपपोलीस महानिरीक्षक गुरुवारी यवतमाळात दाखल झाले. त्यांनी या गुन्ह्यातील तपासाशी निगडित असलेल्या सर्वच अधिकारी-कर्मचाऱ्यांना पाचारण केले. अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले, अवधूतवाडी ठाणेदार मनोज केदारे, लोहारा ठाणेदार दीपमाला भेंडे, सायबर सेलचे प्रभारी अमोल पुरी यांच्याशी गुन्ह्याबाबत विचारपूस केली. सर्वांचेच जबाब नोंदवून घेतले. नऊ महिन्यांपूर्वीच्या कारवाईची चौकशी लागल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या चौकशीतून काय तथ्य बाहेर येते, याकडे लक्ष लागले आहे. नुकतीच औरंगाबाद आयजींनी भूखंडाच्या प्रकरणात अधिकाऱ्यांची चौकशी केली होती.
मदत पोहोचण्यास विलंबाबाबत नाराजी - जिल्ह्यातील क्विक रिस्पॉन्स सिस्टीम व्यवस्थित काम करीत नसल्याबाबत उपमहानिरीक्षकांनी नाराजी व्यक्त केली. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पोलीस मदत पोहोचण्यास वेळ लागत आहे. यामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश उपमहानिरीक्षकांनी दिले. याशिवाय गुन्ह्यांचा तपास व इतर प्रकरणांच्या संदर्भात उपमहानिरीक्षकांकडून सूचना करण्यात आल्या.
काही तपासाबाबत तक्रारी होत्या. याचा आढावा घेण्यात आला. शिवाय क्विक रिस्पॉन्स प्रणालीमध्ये जिल्हा माघारला आहे. यात सुधारणा करण्याचेही निर्देश देण्यात आले. - चंद्रकिशोर मीनापोलीस उपमहानिरीक्षक