लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘‘आयुष्यभर शिकलो तरी केवळ गुडघाभर पाण्यातच आपण पोहाचू शकतो, इतका हा ज्ञानसागर अथांग आहे.’’ अशा शब्दात ‘शिकण्या’ची महती आणि ज्ञानाची व्याप्ती सांगणाºया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘शाळा प्रवेश दिन’ जिल्ह्यात साजरा होणार आहे. यानिमित्ताने जिल्ह्यातील ५ लाख ४२ हजार ७९७ विद्यार्थ्यांसाठी मंगळवारी विविध उपक्रम राबवून भरपूर शिकण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे.शिक्षक दिन, शाळेचा वर्धापन दिन आजवर शाळांनी साजरे केले आहेत. मात्र, ज्यांच्यासाठी शिक्षक आणि शाळा आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी कोणताही दिवस साजरा केला जात नव्हता. राज्य शासनाने यंदा पहिल्यांदाच खास विद्यार्थी दिन साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा जिल्ह्यातील प्रतापसिंग हायस्कूलमध्ये ‘भिवा’ अशा नावानिशी प्रवेश घेतला होता. बाबासाहेब स्वत: प्रचंड संघर्षातून शिकले आणि त्यांनी इतरांनाही शिकण्यासाठी प्रेरित केले. प्रत्येकाने आयुष्यभर शिकत राहिले पाहिजे, हा संदेश बाबासाहेबांच्या जीवनातून मिळाला आहे. म्हणूनच त्यांचा शाळा प्रवेश दिन यापुढे ‘विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा होणार आहे.यानिमित्त जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या ३ हजार ३५२ शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा गौरव केला जाणार आहे. शासकीय शाळांमध्ये ७ हजार ५८४, जिल्हा परिषद शाळांमध्ये १ लाख ८४ हजार ९३५, नगरपरिषद शाळांमध्ये १९ हजार ६५६, खासगी अनुदानित शाळांमध्ये २ लाख ४९ हजार १५१, तर विनाअनुदानित शाळांमध्ये ८१ हजार ४७१ असे साडेपाच लाख विद्यार्थी पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित निबंध, वक्तृत्व, काव्यवाचन स्पर्धा घेतल्या जाणार आहे. तर अनेक शाळांमध्ये माजी विद्यार्थ्यांचा सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव असे कार्यक्रम होणार आहेत. काही ठिकाणी बाबासाहेबांच्या जीवनावरील चित्रपट, पथनाट्य दाखविले जाणार आहेत. जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे शाळांना कार्यक्रम घेण्याबाबत पत्र देण्यात आले आहे. शिवाय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीही कार्यक्रम होत आहे.मजुरांच्या मुलांसाठी हंगामी वसतिगृहेविद्यार्थ्यांचा सन्मान करतानाच स्थलांतरित मजुरांच्या मुलांची शाळा सुटू नये म्हणून २३ हंगामी वसतिगृहांना मान्यता देण्यात आली आहे. पुसद, उमरखेड, दिग्रस आणि महागाव तालुक्यातील शेकडो कुटुंबे उसतोडणीच्या कामासाठी स्थलांतरित होतात. त्यांच्यासोबत त्यांची मुले गाव सोडून गेल्यास त्यांचे शिक्षण थांबते. ही समस्या लक्षात घेता यंदा या चारही तालुक्यात १ हजार ४५४ विद्यार्थ्यांसाठी हंगामी वसतिगृहे सुरू करण्यात आली आहे.कास्ट्राईबतर्फे विद्यार्थी दिन कार्यक्रमयवतमाळ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ७ नोव्हेंबर हा शाळा प्रवेश दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. यानिमित्त कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे येथील लॉर्ड बुद्धा कार्यालयात संध्याकाळी ७ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मार्गदर्शक म्हणून प्रा. सुभाष कुळसंगे हे लाभणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष सिद्धार्थ भवरे, नामदेवराव थूल, किरण मानकर, राजू सूर्यवंशी, दीपक नगराळे, अंकुश वाकडे, अशोक वानखडे, महेंद्र कावळे, देवीदास मनवर, नंदराज गुजर, प्रवीण गोबरे, हेमंत शिंदे, अरुणा बन्सोड आदींनी केले आहे.गणवेश, शिष्यवृत्तीचा घोळ मात्र कायमएकीकडे विद्यार्थ्यांचा गौरव केला जात असताना अद्यापही हजारो विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात शिक्षण विभाग अपयशी ठरला आहे. अर्धे सत्र संपले तरी गणवेशाचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात आलेले नाहीत. तर त्याचवेळी आॅनलाईन पद्धतीतील घोळामुळे विविध शिष्यवृत्तींचे पैसेही गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत. विद्यार्थ्यांचे खाते नसल्याचे सांगितले जाते. तर दुसरीकडे पोषण आहाराच्या किराणा खरेदीचेही वांदे झाले आहेत. केवळ पांढरा भात दिला जात आहे. त्यामुळे एकीकडे शिकण्याला प्रोत्साहन, तर दुसरीकडे शिक्षणाचा अडथळा, अशा दुहेरी भूमिकेत शिक्षण विभाग दिसत आहे.
साडेपाच लाख विद्यार्थ्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 10:00 PM
‘‘आयुष्यभर शिकलो तरी केवळ गुडघाभर पाण्यातच आपण पोहाचू शकतो, इतका हा ज्ञानसागर अथांग आहे.’’
ठळक मुद्देआज विद्यार्थी दिन : भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘शाळा प्रवेश दिनी’ शिकण्याच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन