श्रीक्षेत्र माहूर : माहूर येथील रामगड किल्ल्यात १० सप्टेंबर २०१४ रोजी झालेल्या प्रेमी युगुलाच्या हत्येप्रकरणी सर्व ११ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. शाहरुख खान फिरोज खान (वय २३ रा.उमरखेड) आणि निलोफर खालीद बेग (२० रा.पुसद) हे प्रेमी युगुल दुपारच्या वेळेस किल्ला पाहण्यास गेले होते. दिवसभर दोघेही घरी न आल्याने नातेवाईकांनी माहूर येथे येऊन शोध घेतला असता दुसऱ्या दिवशी किल्ल्यातील हत्ती दरवाजाजवळ या प्रेमी युगुलाचे मृतदेह मिळाले होते़ या प्रकरणात आॅनर किलिंगच्या संशयावरुन अकरा आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता़
मयत निलोफरचे वडील विकार अहमद जानी बेग (रा.फुलसांगवी ता.महागाव जि.यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध माहूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता़ पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात राजू रघुनाथ गाडेकर, शेख जावेद शेख हुसेन ऊर्फ जावेद पेंटर, रंगनाथ शामराव बाबतकर, शेषराव श्यामराव बाबतकर, कृष्णा ऊर्फ बाबू मारोती शिंदे, रघु डॉन ऊर्फ रघु रोकडा रघुनाथ नाना पळसकर, सय्यद अनवरअली अखतर अली, कैसर मिर्झा, बहादुर मिर्झा, खालेद बेग मिर्झा कमर बेग, विकार अहेमद नवाब जानी, नवाब जानी कमर बेग अशा ११ जणांचा या आरोपात समावेश होता.आरोप सिद्धच झाला नाहीया प्रकरणी सरकारी पक्षाने ३० साक्षीदारांचे जबाब न्यायालयासमक्ष नोंदविले. न्यायालयासमक्ष या आरोपींचा त्या प्रकरणात समावेश होता की, नाही, हेच सिद्ध झाले नाही. परिणामी, सादर पुराव्यातून गुन्हा सिद्ध न झाल्याने या सर्व ११ आरोपींची अतिरिक्त सत्र न्या़ के. एन. गौतम यांनी निर्दोष मुक्तता केली.