विठ्ठलराव जाधव : पोलीस महानिरीक्षकांची पुसदला भेट, उमरखेडला एसडीपीओ कार्यालयप्रकाश लामणे पुसदजगात पैसाच सर्व नाही, तर प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा महत्त्वाची आहे. त्यासाठी गुण्यागोविंदाने राहून गोरगरिबांची सेवा करणे गरजेचे आहे. समाजात अशांतता व समाजविघातक कृत्य करणाऱ्या गुंड व गुन्हेगारांची यापुढे गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.विठ्ठलराव जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर पुसद विभागातील सर्व पोलीस अधिकारी व शांतता समितीच्या पदाधिकाऱ्यांची विशेष सभा गुरुवारी येथे आयोजित होती. त्यासाठी ते येथे आले असता ‘लोकमत’शी बोलत होते. उमरखेड येथील स्वतंत्र एसडीपीओ कार्यालयाबाबत विचारले असता ते म्हणाले, पुसद विभाग खूप मोठा आहे. त्यामध्ये नऊ पोलीस ठाणे समाविष्ट आहे. त्यामुळेच उमरखेड येथे स्वतंत्र उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. तो मंजूरही झाला आहे. लवकरच याबाबत घोषणा होवून उमरखेड येथे स्वतंत्र एसडीपीओ कार्यालय निर्माण होईल. त्यामुळे गुन्हेगारांवर वचक बसविणे सोपे जाईल, असे त्यांनी सांगितले.जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत डॉ.जाधव म्हणाले, बुधवारी अमरावती परिक्षेत्रातील पाचही जिल्हा पोलीस अधीक्षकांशी याबाबत चर्चा केली. आपल्या जिल्ह्यात कोणते गुन्हे वाढले आहे, राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर वाटमारीचा आढावा घेतला आहे. पोलिसांची गस्त वाढविण्यात आली असून नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.पुसद शहरात अलिकडे घालेल्या दगडफेकीच्या घटनाबाबत डॉ.जाधव म्हणाले, शहरातील दगडफेकीच्या प्रकारानंतर तब्बल १७ व त्यापेक्षा अधिक गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शहरात फिक्स पॉर्इंट देण्यात आले आहे. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीला पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार असून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी घेतली जाईल. एमपीडीए व मोक्का कायद्यांतर्गत बोलताना याबाबत संबंधितांकडे गुन्हेगारांचे प्रस्ताव पाठविले असून कारवाईला सुरुवात झाली आहे. कोणताही धर्म किंवा महापुरुष दुसऱ्याचा द्वेष करण्याचे सांगत नाही. त्यामुळे धर्माचरण करताना नागरिकांनी इतरांचाही आदर करावा, असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.विठ्ठल जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.
शांततेला सुरूंग लावणारे गुंड निशाण्यावर
By admin | Published: April 14, 2017 2:42 AM