लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : गौरी पूजनानिमित्त घराघरात महालक्ष्मीचे आवाहन केले जाते. तीन दिवसांचा हा सोहळा अतिशय मनोभावे साजरा केला जातो. घरोघरी ना-ना प्रकारचे नैवेद्य व मिष्टान्नाची मेजवाणी गौरी गणपतीला दिली जाते. गौरी पूजनाचा उत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची संकल्पना घाटंजीतील युवकांनी राबविली. त्यांनी शहरातील ५१ निराधार, अपंग व वयोवृद्ध मातांचा सत्कार केला.स्त्री ही लक्ष्मीचं प्रतीक आहे, असं माणणारी आपली संस्कृती. आईला तर अनन्य साधारण महत्त्व आहे. ती ईश्वराचं प्रती रूप आहे. मातृशक्तीचा जागर म्हणूनच महालक्ष्मीचे पूजन घराघरात केले जाते. प्रत्येक गोष्ट अतिशय काटेकोरपणे पालन करून गौरी मातेची आराधना केली जाते. या पवित्र व श्रद्धेच्या वातावरणात खऱ्याखुऱ्या लक्ष्मीचं पूजन करावे, असा संकल्प सुरज हेमके व त्याच्या मित्रमंडळांनी केला. यासाठी त्यांनी घाटंजी शहरातील दुर्धर परिस्थितीशी लढून आपल्या कुटुंबाचा गाडा चालविणाऱ्या मातांची निवड केली. यामध्ये निराधार, अपंग, वयोवृद्ध मातांचा समावेश होता. हे मंडळ स्वत: मातांच्या घरी जावून त्यांचे पाय धुवून त्यांच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करून त्यांना साडीचोळी भेट देत होते. परिस्थितीशी कणखरपणे लढणाऱ्या या निराधार मातांनी हा अनपेक्षित गौरवाचा सोहळा पाहून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. समाजात आपल्या एकाकी आयुष्याचीही दखल घेणारं कुणीतरी आहे याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. तर खऱ्या गौरींचं पूजन आपल्या उपक्रमातून झालं याचा भाव सुरज हेमके व त्याच्या मित्रांना तृप्त करणारा ठरला. हा उपक्रम असाच पुढे कायम ठेवला जाईल, असाही संकल्प त्या युवकांनी बोलून दाखविला.
घाटंजी शहरातील ५१ निराधार मातांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 5:00 AM
हे मंडळ स्वत: मातांच्या घरी जावून त्यांचे पाय धुवून त्यांच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करून त्यांना साडीचोळी भेट देत होते. परिस्थितीशी कणखरपणे लढणाऱ्या या निराधार मातांनी हा अनपेक्षित गौरवाचा सोहळा पाहून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. समाजात आपल्या एकाकी आयुष्याचीही दखल घेणारं कुणीतरी आहे याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. तर खऱ्या गौरींचं पूजन आपल्या उपक्रमातून झालं याचा भाव सुरज हेमके व त्याच्या मित्रांना तृप्त करणारा ठरला.
ठळक मुद्देआगळेवेगळे गौरीपूजन : युवकांनी राबविला उपक्रम, साडीचोळी देत केली कृतज्ञता व्यक्त