कॉंग्रेस पदाधिकारी नेमके मोर्चा, आंदोलनावेळीच गायब कसे होतात? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले संतापले
By विशाल सोनटक्के | Published: March 29, 2023 10:29 AM2023-03-29T10:29:14+5:302023-03-29T10:29:53+5:30
कार्यक्रमावेळी कार्यकर्ते आणण्याचे आता पदाधिकाऱ्यांना टार्गेट
यवतमाळ : प्रदेश कॉंग्रेसच्या माध्यमातून जनतेचे विविध प्रश्न तसेच समस्यांसह राजकीय मुद्द्यांवर मोर्चे, उपोषण, सत्याग्रहासह आंदोलनाचे कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले जातात. अशा कार्यक्रमावेळी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसह उपस्थित राहणे अपेक्षित असताना खुद्द पदाधिकारीच गायब राहत आहेत. या प्रकाराची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर दखल घेतली आहे. वारंवार गैरहजर राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा देताना, या पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमावेळी कार्यकर्ते आणण्याचे टार्गेटही आता पटोले यांनी दिले आहे.
कर्नाटकातील कोलार येथील सभेत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ललित मोदी, नीरव मोदी यांची नावे घेत सगळेच मोदी चोर कसे? असा सवाल केला होता. या वक्तव्याबाबत गुजरातमधील न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर अवघ्या २४ तासात काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या खासदारकी रद्दचे नोटिफिकेशनही तत्परतेने निघाले. सर्वोच्च नेत्यावर अशी कारवाई केल्याने एक प्रकारे भाजपने कॉंग्रेसला फुलटॉस टाकला होता.
या कारवाईनंतर कॉंग्रेस कार्यकर्ते गावखेड्यापासून देशपातळीवर रान उठवतील, असेच अनेकांना वाटत होते. खरे तर कॉंग्रेस कार्यकर्त्यांना आंदोलनाच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचीही संधी याद्वारे मिळाली आहे. मात्र अनेक ठिकाणी मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसचे आंदोलन पार पडले. यानिमित्ताने पक्षीय कार्यक्रमावेळी कॉंग्रेस पदाधिकारी दाखवीत असलेली उदासीनता प्रकर्षाने दिसून आली. याबरोबरच इतर वेळच्या मोर्चे, उपोषण, आंदोलनावेळीही अनेक पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित राहत नसल्याचे निदर्शनास आल्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी झूम मीटिंगद्वारे या पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.
पक्षाने आपल्यावर जबाबदारी दिलेली आहे. त्यानुसार तिचे उचित पालन होेणे अपेक्षित आहे. मात्र प्रदेश जिल्हा व ब्लॉक स्तरावरील अनेक पदाधिकारी संघटनात्मक पद घेवूनही पक्षाचे काम करीत नसतील तर त्यांच्या जागी इतरांना संधी देता येईल. वारंवार गैरहजर राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांची माहिती प्रदेश कार्यालयाकडे तातडीने पाठवावी, असे निर्देश प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी राज्यभरातील कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना दिले आहेत.
प्रदेशसाठी ४०, तर जिल्हा पदाधिकाऱ्याला २० कार्यकर्त्यांचे उद्दिष्ट
या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे संघटन व प्रशासन सरचिटणीस देवानंद पवार यांनी राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना मंगळवार, २८ मार्च रोजी पत्रच पाठविले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार या पुढे होणाऱ्या प्रत्येक आंदोलन, मोर्चा तसेच कार्यक्रमात प्रदेश पदाधिकाऱ्याने किमान ४० कार्यकर्ते, जिल्हा पदाधिकाऱ्याने २०, तर ब्लॉकस्तरीय पदाधिकाऱ्याने १० कार्यकर्ते सोबत आणावेत. जे पदाधिकारी दिलेल्या उद्दिष्टानुसार कार्यकर्ते आणणार नाहीत, अशांची माहिती प्रदेश कार्यालयास तातडीने कळविण्याच्या सूचनाही या पत्राद्वारे प्रदेश कॉंग्रेसने पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.