लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वाशिम जिल्ह्यातील जऊळका पोलीस ठाणे हद्दीत विदेशी दारू व ११ लाखांच्या मुद्देमालासह पकडले गेलेले यवतमाळातील वाहन जिल्हा ओलांडून वाशिममध्ये पोहोचलेच कसे? या मुद्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी मंगळवारी दुपारपासूनच चौकशी सुरू केली आहे.‘पोलिसांच्या सत्काराचा आयोजक दारू तस्करीत अटक’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने मंगळवारच्या अंकात वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी घेतली आहे. त्यांनी या प्रकरणात आरोपी असलेल्या दोघांची नेमकी पार्श्वभूमी काय, त्यांचे आणखी कोणकोणते उद्योग-व्यवसाय आहेत, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का आदी मुद्यावर माहिती घेतली. या वाहनाकडे अधिकृत पास नव्हते हे स्पष्ट झाले. मग हे वाहन यवतमाळ जिल्ह्याची सीमा ओलांडून वाशिम जिल्ह्यात पोहोचले कसे या मुद्यावर एसपींनी चौकशी केंद्रीत केली आहे. या अनुषंगाने यवतमाळ ते वाशिम या मार्गावरील प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली. यवतमाळ ते वाशिम या प्रवासात जिल्ह्यात अनेक ठिकाणी तपासणी नाके बसविले गेले आहे. या नाक्यांवर पोलिसांनी विनापास वाहनाला रोखले का नाही, असा मुद्दा उपस्थित केला गेला. या मार्गात जिल्ह्याच्या हद्दीत कुठे-कुठे पोलिसांचे तपासणी नाके आहेत, तेथे ७ मे रोजी नेमकी कुणाची ड्युटी होती याची माहिती घेतली जात आहे. विनापरवाना गाडी पास झाल्याने २४ तास तगडा पोलीस बंदोबस्त असूनही जिल्ह्याच्या सीमा सुरक्षित नसल्याची बाब या प्रकरणाने उघड झाली.दारू तस्करीच्या या प्रकरणात अटकेतील दोन्ही आरोपींना दुसऱ्या दिवशी जामीन झाला. मात्र त्यांचे वाहन अद्याप जऊळका पोलीस ठाण्यातच जप्तीत आहे.ऑफर धुडकावली अन् वाचलावाशिम जिल्ह्यात ७ मे रोजी दारू आणायला जाताना या दोघांनी स्टेट बँक चौकातील एका समव्यावसायिकालाही सोबत चालण्याची ऑफर दिली होती. मात्र त्याने ही ऑफर नाकारल्याने तो तस्करीतील आरोपी बनण्यापासून वाचला.सत्काराला उपस्थित पोलिसांची झाडाझडतीदारू तस्करीत अडकलेल्या एकाने लॉकडाऊन व संचारबंदी असताना आपल्या कॉलनीत सत्कार घेतला होता. शहरातील काही पोलीस अधिकारी-कर्मचारी त्याला उपस्थित होते. या उपस्थितांपैकी प्रमुख अधिकाºयांची मंगळवारी पोलीस अधीक्षकांनी चांगलीच झाडाझडती घेतली. ‘सर, माफ करा, मला आयोजकांची पार्श्वभूमी माहीत नव्हती’ अशा शब्दात या अधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांकडे क्षमायाचना केली. या अधिकाऱ्याच्या वरिष्ठालाही विचारणा केली गेली. मात्र वरिष्ठांनी कनिष्ठाकडे बोट दाखवून आपली सुटका करून घेतल्याचे सांगितले जाते. पोलिसांच्या सत्कार कार्यक्रमाचा आयोजक दारूचा तस्कर निघाल्याने जिल्हा पोलीस प्रशासनाच्या कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे.पासचा घोळ, प्रतिष्ठिताच्या नावाचा वापर११ लाखांच्या दारू तस्करीतील सूत्रधार आणि पोलिसांच्या सत्कार कार्यक्रमाचा आयोजक धामणगाव रोडवरील रियेल इस्टेट व फायनान्स क्षेत्रातील एका प्रतिष्ठीताच्या नावाचा सर्रास जाहीरपणे वापर करतो. आपल्या सर्व धंद्यांना या प्रतिष्ठीताचेच पाठबळ असल्याचे सांगतो. त्यामुळे कायम नियमाने चालणाऱ्या या प्रतिष्ठीताकडेही आता समाजामध्ये साशंकतेने पाहिले जाते. या सूत्रधार तथा आयोजकाने लॉकडाऊन काळातील ऑनलाईन ‘पास’चाही बराच घोळ घातल्याची माहिती आहे. सर्वच पोलिसांशी आपले सलोख्याचे संबंध आहेत, आपण कोणतीही पास कुणालाही क्षणात बनवून देऊ शकतो असे, म्हणून या सूत्रधाराने ‘पास’चे दुकान मांडले. धामणगाव रोडवरील त्या प्रतिष्ठीताला मात्र संशय आल्याने व पासवर खोडतोड असल्याने त्यांनी ही पास नाकारली. तस्करीसारख्या प्रकरणात नाव आल्याने या प्रतिष्ठीताने मंगळवारी या निकटवर्तीय सूत्रधाराची चांगलीच कानउघाडणी केल्याचे सांगितले जाते.
दारू आणणारे वाहन यवतमाळातून पास झालेच कसे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 5:00 AM
‘पोलिसांच्या सत्काराचा आयोजक दारू तस्करीत अटक’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने मंगळवारच्या अंकात वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी घेतली आहे. त्यांनी या प्रकरणात आरोपी असलेल्या दोघांची नेमकी पार्श्वभूमी काय, त्यांचे आणखी कोणकोणते उद्योग-व्यवसाय आहेत, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का आदी मुद्यावर माहिती घेतली. या वाहनाकडे अधिकृत पास नव्हते हे स्पष्ट झाले.
ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांकडून चौकशी सुरू : वाशिम मार्गावरील पोलीस अधिकाऱ्यांना झाली विचारणा