लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सर्वसामान्य नागरिकांच्या कुटुंबातील गॅस सिलिंडर हा जिव्हाळ्याचा विषय आहे. यानंतरही केंद्र शासनाने गॅस सिलिंडरच्या किमती दर महिन्याला वाढविण्याचेच काम केले आहे. गत वर्षभराचा विचार केला तर गॅसच्या किमती २४१ रुपयांनी वाढल्या आहेत. २०१४ चा विचार केला तर गॅस सिलिंडरच्या किमती तब्बल दुपटीने वाढल्या आहेत. या तुलनेत मिळणारी सबसिडी मात्र गायब झाली आहे. यातून गृहिणींचे बजेट मात्र कोलमडले आहे. जीवनावश्यक बाब म्हणून केंद्र शासनाने उज्वला गॅस योजना आणली. घरोघरी गॅस सिलिंडर दिले आणि केरोसीन काढून घेतले. आता केरोसीन नाही आणि गॅस सिलिंडरचे दर नियंत्रणाबाहेर आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना वाढत्या महागाईचा सामना करावा लागत आहे. यातून परिस्थिती बिकट झाली आहे.
घर खर्च भागवायचाकसा
सर्वसामान्य महिलांना वाढत्या महागाईने मोठा झटका दिला आहे. दर महिन्याचे बजेट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशा परिस्थितीत दोन पैसे वाचणे तर दूरच राहिले, उलट खर्च वाढला आहे. सरकारने महागाई नियंत्रित करावी. - दुर्गा गादेवार, गृहिणी
२०१४ मध्ये ४८० रुपयाला सिलिंडर मिळत होते. आता सिलिंडरची किंमत ८६८ रुपये झाली आहे. सहा वर्षात सिलिंडरची किंमत दुप्पटीने वाढली आहे. सबसिडी मात्र गायब झाली आहे. यातून महिलांमध्ये संतापाची लाट आहे. - उषा मुरखे, गृहिणी
गावांत पुन्हा चुली पेटल्या उज्वला गॅस योजनेतून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना गॅस सिलिंडरच्या जोडणीसाठी मदत देण्यात आली. यातून गॅस कनेक्शन वाढले. आता गॅस भरायलाही पैसे नाही. गॅस सिलिंडरची संख्या वाढल्याने गावामधील केरोसीन बंद करण्यात आले आहे. आता गॅस सिलिंडरचे दर वाढलेले आहे. मात्र केरोसीन गावात उपलब्ध नाही. आदिवासी दुर्गम भागात महिलांनी गॅस सिलिंडरवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली होती. एक वेळा सिलिंडर खरेदी केल्यानंतर आता जवळ पैसे नाही. यामुळे ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटल्या आहेत. परिसरातील जलतन गोळा करून महिला गॅस असतानाही चुलीवर स्वयंपाक करीत आहे. यावरून ग्रामीण भागातील भीषण वास्तव्य पुढे आले आहे.
जुलैमध्ये २५ रुपयाने वाढले दर घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती दर महिन्याला वाढतच आहे. आता जुलै महिन्यात नव्याने २५ रुपयांची भर पडली आहे. यामुळे ८६८ रुपयाला सिलिंडर खरेदी करावे लागणार आहे.