अविनाश साबापुरे, यवतमाळ : शालेय कामकाजाचा कणा असलेल्या लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या संचमान्यतेचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून ऐरणीवर आला आहे. अखेर ही संचमान्यता आता लवकरच होऊ घातली असून त्यासाठी शिक्षण विभागाने तालुकानिहाय रोस्टर तपासणीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या तपासणीनंतर व संचमान्यता झाल्यानंतरच कोणत्या शाळेत किती लिपिकांची पदे राहतात, हे स्पष्ट होणार आहे.
विशेष म्हणजे, शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रोस्टर तपासणीचा मुद्दा काही दिवसांपूर्वीच थेट राज्याच्या शिक्षण सचिवांच्या दालनात पोहोचला होता. त्यासाठी शिक्षण सचिवांनी २२ एप्रिल रोजी आढावा बैठक घेतली होती. त्या बैठकीतील निर्देशानुसार आता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बिंदूनामावलीची तपासणी केली जाणार आहे. महाराष्ट्र शिक्षण सेवा गट क आणि अन्य विभागस्तरावरील लिपिक संवर्गातील पदांची बिंदूनामावली १५ मे पूर्वी प्रमाणित करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आली. त्या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षण संस्थांमधील शिक्षकेतर कर्मचारी या पदाची रोस्टरची प्राथमिक तपासणी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात केली जाणार आहे. याबाबत शिक्षणाधिकारी डाॅ. जयश्री राऊत यांनी २ मे रोजी सर्व शाळांना आदेश जारी केले आहेत.
त्यानुसार, शिक्षण संस्थांनी आपल्याकडील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बिंदूनामावली रोस्टरची प्राथमिक तपासणी करुन घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या तपासणीकरिता योग्य ती कागदपत्रे घेऊन हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी ६ मेपासून ९ मेपर्यंत तालुकानिहाय वेळापत्रकही ठरवून देण्यात आले आहे.
ही कागदपत्रे घेऊन या!
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रोस्टर तपासणी करण्यासाठी आयुक्तांनी (मावक) तपासणी केलेले जुने रोस्टर व नवीन रोस्टर, तसेच २०१२-१३ ते २०२२-२३ पर्यंतच्या संचमान्यता, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पायाभूत संचमान्यता, जातीचे प्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र, प्रथम वैयक्तिक मान्यता, जाहिरातपूर्व परवानगी, जाहिरातीचे कात्रण, १९९७ नंतर रिक्त झालेल्या कर्मचाऱ्यांची माहिती तसेच सहायक आयुक्त (मावक) यांच्या चेकलिस्ट प्रमाणे सर्व दस्तावेजांसह प्रस्ताव सादर करावा लागणार आहे.
या तारेखला होणार रोस्टर तपासणी
- ६ मे : वणी, मारेगाव, झरी, पांढरकवडा- ७ मे : राळेगाव, कळंब, बाभूळगाव, घाटंजी- ८ मे : पुसद, उमरखेड, महागाव, दिग्रस- ९ मे : दारव्हा, आर्णी, नेर, यवतमाळ