लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे यवतमाळ विभागातून ४८५ पैकी केवळ ७१ बस फेऱ्या मार्गावर धावत आहे. महामंडळाकडून बसफेऱ्या वाढविण्यासाठी विविध प्रयोग केले जात असतानाही अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. बाहेर जिल्ह्यात जाण्यासाठी तर यवतमाळ विभागातून अमरावती वगळता कुठेही बसेस सुरू नाहीत. बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या बसेसद्वारे वर्धा, नागपूर, नांदेड, चंद्रपूर आदी ठिकाणी प्रवास करावा लागतो. महामंडळाचे अधिकारी संबंधित कर्मचाऱ्याचे गाव गाठून त्यांच्या कुुटुंबाची, गावातील प्रतिष्ठीत व्यक्तीची, लोकप्रतिनिधीची भेट घेवून एसटी कर्मचाऱ्याला कामावर पाठवा, अशी विनंती करत आहे. यानंतरही ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. परिणामी एसटीच्या फेऱ्या वाढण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याचे सांगितले जाते.
संपकरी संपावर ठाम - एसटीचे शासनात विलीनीकरण झाल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. - कितीही आर्थिक अडचणी निर्माण झाल्यातरी विलीनीकरणाचा लढा सुरूच राहील, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. तीन महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाही.
पुसद, उमरखेड आगारातून केवळ चार बसेस - पुसद आणि उमरखेड आगारातून प्रत्येकी केवळ दोन बसेस मार्गावर धावत आहे. या आगारात अनुक्रमे ६५ आणि ५५ बसेस आहेत. - सर्वाधिक २८ बसेस यवतमाळ आगारातून सोडल्या जात आहे. या आगारामध्ये ८३ बसेस आहे. मुख्यालयांच्या ठिकाणचे बसस्थानक असतानाही कर्मचाऱ्यांचा थंड प्रतिसाद आहे.
ग्रामीणची मदार खासगीवरच - सध्या सुरू असलेल्या बसफेऱ्या केवळ तालुक्याच्या गावापर्यंत जात आहे. ग्रामीण भागात अपवादानेच बसफेरी आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांंना खासगी वाहनांशिवाय पर्याय नाही.
बसफेऱ्या वाढविण्यासाठी विभाग पातळीवर प्रयत्न केेले जात आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात येत आहे. याशिवाय एसटी कार्यशाळेतील यांत्रिक कर्मचारी, वाहतूक निरीक्षक, वाहतूक नियंत्रक यांची सेवा चालक-वाहक म्हणून घेतली जात आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची आरोग्य चाचणी आदी बाबी तपासून त्यांना कामावर घेण्यात येत आहे. कर्मचारी कामावर यावे यासाठी अधिकाऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहे. यामुळे फेऱ्या वाढतील. - श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक