लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात वाहतूक नियम मोडले म्हणून कारवाई जोरात केली जाते. प्रत्यक्षात मात्र वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी लागणारी सोई-सुविधा कुठेच उपलब्ध नाही. येथील टाॅकीज, बँक, दवाखाने, मुख्य बाजारपेठ याशिवाय इतर व्यावसायिक उपयोगांच्या इमारतींमध्ये पार्किंगची सुविधाच नाही. रस्त्याच्या कडेवर दुचाकी, चारचाकी उभी ठेवावी लागते. वाहतूक पोलिसांची टोईंग व्हॅन दुचाकीवर कारवाई करून मोकळी होते. त्यामुळे शहरातील वाहतुकीला शिस्त लागणार कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातील अंतर्गत रस्ते, कोचिंग क्लासेससमोरसुद्धा अशीच अवस्था असते. याबाबत निर्णय झालेला नाही.
फूटपाथ अतिक्रमणाच्या विळख्यात रस्ते रुंदीकरण करून पायी जाणाऱ्यांसाठी शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात फूटपाथ तयार केले आहे. या फूटपाथवर अतिक्रमण झाले असून अनेकांनी आपले व्यवसाय थाटले आहे. त्यामुळे पायी जाणाऱ्यांची अडचण आहे.
₹ ३,४०,३४,६५० चा दंड भरला वर्षभरातवाहतूक नियम मोडले म्हणून जिल्हा वाहतूक शाखेने मागील वर्षात धडक कारवाई केली. यामुळे वाहनधारकांना तीन कोटी ४० लाख ३४ हजार ६५० रुपयांचा दंड भरावा लागला. आता तर दंडाची रक्कम दुप्पटीने वाढविण्यात आली आहे.
वाहतूक सिग्नल लागणार कधी ?- शहरातील रस्ते रुंदीकरणाच्या कामात वाहतुकीचे सिग्नल काढून ठेवले. - जवळपास तीन वर्षांपासून शहरात कोणत्याच चौकात वाहतूक सिग्नल सुरू करण्यात आलेले नाही. - वाहतूक सिग्नल नसल्याने चौकांमध्ये अपघाताचे प्रमाणात वाढले आहे. यावर नियंत्रणासाठी सिग्नल लावणे आवश्यक आहे.
रस्ता सुरक्षिततेसाठी कारवाई अपघात होऊ नये, प्रत्येकाचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी वाहतूक नियम आहेत. नागरिकांनी नियम पाळून स्वत:सोबत दुसऱ्यांनाही सुरक्षित करावे. - प्रदीप शिरस्कर, वाहतूक शाखा प्रभारी