नाशिक- चांदवड येथील मुंबई आग्रारोडवरील मोदी इमारतीमध्ये नव्याने उभारलेल्या खाजगी कोविडसेंटरच्या इमारतीला दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक आग लागून लाखो रुपयाचे नुकसान झाले. आजच दुपारी अडीच वाजेच्या सुमारास या खाजगी कोविड सेंटरचे उद्घाटन होणार होते त्यापुर्वीच आग लागली. या कोविड सेंटरमध्ये सुमारे 10 ते 12 रुग्ण होते मात्र सुदैवाने ते बचावले.
चांदवड मुंबई आग्रारोडवर मोदी कॉम्प्लेक्समध्ये खालच्या मजल्यावर गाळ्यामध्ये प्लॉस्टिकचा कारखाना, त्यांच्या शेजारी दत्तात्रेय गायकवाड यांचे मौनीगिरी फर्निचर , हॉटेल रन वे आहेत. दुपारी दोन वाजेच्या सुमारास प्लॉस्टिक कारखान्यात अचानक आग लागली. या आगीने रौद्ररुप धारण करीत शेजारील फर्निचरचे दुकान, हॉटल रनवे यांना भक्ष्यस्थानी घेतले परिसरातील नागरीकांनी आगीचे स्वरुप बघताच फर्निचर वाचविण्याचा प्रयत्न केला तर नव्याने होणा -या कोविड सेंटरमध्ये वरच्या मजल्यावर काही कोविडचे रुग्ण दाखल झाले होते.
तातडीने घटनेचे गांभीर्य ओळखुन तेथील रुग्णांना तातडीने बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच खाजगी टॅकरवाले, सोमा कंपनीचा अग्नीशामक दल, मालेगाव, पिंपळगाव, मनमाड येथील अग्नीशामक दलाचे बंबानी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र आगीने रौद्ररुप एवढे धारण केले की, एका बाजुची आग कमी झाली की दुस -या बाजुला आग लागत असल्याचे चित्र दिसत होते.
घटनास्थळी कोविड सेंटरच्या उद्घाटनासाठी आलेले आमदार डॉ. राहुल आहेर, जिल्हा परिषद सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन आहेर, प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार प्रदीप पाटील, गटविकास अधिकारी महेश पाटील, मुख्याधिकारी अभिजीत कदम व इतर मान्यवरांनी भेट देऊन पाहणी केली. चांदवडचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर व सर्व पोलिस कर्मचारी , अग्नीशामक दलाच्या जवानांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.आगीत नेमकी किती लाखाची नुकसान झाली व आग कशामुळे लागली याची माहिती मिळू शकली नाही.