- देवेंद्र पोल्हेमारेगाव (जि. यवतमाळ) : कोरोना काळात एकीकडे माणूस माणसाला टाळू लागला असताना दुसरीकडे काही लोक माणुसकी जिवंत असल्याची अनुभूती देत आहेत. त्याचा अनुभव तालुक्यातील तान्हा पोड या कोलाम वस्तीत आई-वडिलांविना पोरक्या सुचिता श्यामराव कुमरे या मुलीच्या विवाहप्रसंगी आला. मानवता धावून आली आणि तिचे शुभमंगल पार पडले.आदिवासीबहुल तालुक्यातील तान्हा पोड येथील सुचिता ही अवघी पाच वर्षांची असताना वडिलांनी कर्ज आणि पत्नीच्या आजारपणाला कंटाळून २००८ मध्ये आत्महत्या केली. त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच आजारी आईनेही देह त्यागला. खेळण्या-बागडण्याच्या वयात तिच्यावर वृद्ध आजी-आजोबा आणि दोन लहानग्या भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी येऊन पडली. स्वत:ला सावरत सुचिताने समाजासमोर आदर्श निर्माण केला. मुलगा, सून तारुण्यात गेल्याने खचलेल्या आजी-आजोबांना तिने जगण्याचं बळ दिलं. लहान भावंडांना शासकीय आश्रमशाळेत प्रवेश देऊन शिक्षणाचा श्रीगणेशा गिरवायला लावला. यात तिचे शिक्षण मागे पडले.तिच्यावरील आदर्श संस्कार पाहून तिला लग्नासाठी मागणी होऊ लागली, परंतु जिथे एकवेळच्या जेवणाची भ्रांत होती, तिथे लग्नसोहळा कसा करणार, हा प्रश्न भेडसावू लागला. गावातील काही लोकांनी ही बाब पंचायत समिती सदस्य सुनीता लालसरे व त्यांच्या पतीच्या कानावर घातली. त्यांनी गावकऱ्यांशी विचारविनिमय करून सुचिताची केळापूर तालुक्यातील खैरी येथील सुरेश आत्राम नामक तरुणाशी विवाहगाठ बांधली. लग्न सोहळ्याचा बराचसा खर्च लालसरे दाम्पत्याने उचलला. मोठ्या आनंदात मोजक्या नातलगांच्या उपस्थितीत २१ मे रोजी ती विवाह बंधनात अडकून सासरला निघून गेली तेव्हा अवघ्या गावाच्या डोळ्यात आसवे तरळली.
मानवता धावून आली अन् निराधार सुचिताचे पार पडले शुभमंगल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 9:08 AM