लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ग्रामीण भागात जशी गरिबी मोठ्या प्रमाणात आहे, तसेच तंबाखू खर्रा खाणाऱ्यांचे प्रमाणही प्रचंड आहे. दैनंदिन गरजा भागवू न शकणारी माणसे व्यसनात मात्र कोट्यवधी रुपये उधळत असल्याचे विदारक वास्तव बालपंचायतीच्या विद्यार्थ्यांनी पुढे आणले आहे. तालुक्यातील १६ गावांनी वर्षभरात चक्क दीड कोटी रुपयांचे खर्रे पचविल्याची बाब या विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणातून पुढे आली.जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठाण तसेच टाटा ट्रस्टच्या सहकार्याने हे सर्वेक्षण करण्यात आले. मंगळवारी या सर्वेक्षणातील तथ्य पत्रकार परिषदेत मांडण्यात आले. १७ ते २३ जानेवारीपर्र्यंत सुकळी, येळाबारा पोड, धानोरा, गणेशपूर, आकपुरी, चौकी आकपुरी, चौकी झुली, वडगाव, वरुड, वरझडी, येवती, हातगाव, कारेगाव, यावली, मुरझडी, रामनगर या १६ गावांमध्ये विद्यार्थ्यांनी सर्वेक्षण केले. गुणवत्तापूर्ण शिक्षण व युवा कौशल्य विकास या उपक्रमाचा भाग म्हणून या १६ गावांमध्ये विद्यार्थ्यांची बालपंचायत स्थापन करण्यात आली आहे. याच विद्यार्थ्यांनी सर्वे केला.
अशी झाली सुरूवातसर्वे करताना मुलांना गावात सर्वत्र खऱ्याच्या प्लास्टिक पन्न्या आढळल्या. रोज अशा किती पन्न्या गावात फेकल्या जातात, असा विचार त्यांनी केला. तितक्या खऱ्यावर आपल्या पालकांचा, गावकऱ्यांचा खर्च होत असणार, ही बाब त्यांनी हेरली. आपण पालकांना पेन, वहीसाठी पैसे मागितले तर ते देत नाही. म्हणूनच व्यसनावर होणारा अनाठायी खर्च पालकांच्या लक्षात आणून दिला पाहिजे, असा विचार मुलांनी केला. समन्वयक सुनिल भेले यांच्या मार्गदर्शनात तालुका समन्वयक, क्षेत्रीय समन्वयक, गाव समन्वयक व बालपंचायतीच्या मुलांनी गावपातळीवर सर्वेचे नियोजन केले.
असा झाला सर्वेसमन्वयक सुनिल भेले यांच्यासह बालपंचायतीचे विद्यार्थी कल्याणी ढग (वरुड), यश बलकी (हातगाव), श्रद्धा गुंजकर (सुकळी) यांनी पत्रकार परिषदेत संपूर्ण सर्वेक्षणाचा तपशील सादर केला. सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत दर दोन तासांनी गावात किती खर्रे विकले जातात याची माहिती मुलांनी घेतली. त्यासाठी गावातील रस्त्यांचा नकाशा काढून पानठेले कुठे कुठे आहे हे निश्चित केले. पानठेला चालकांना विचारून दिवसभरातील खर्रा विक्रीची माहिती घेतली गेली. त्यासोबतच दिवसभरात रस्त्यावर फेकण्यात आलेल्या खऱ्याच्या पन्न्याही उचलून मोजण्यात आल्या.या सर्वेत एकूण २१० मुले सहभागी झाली होती. १६ गावांमध्ये २२ हजार १३ पन्न्या मुलांनी वेचल्या. या गावांमध्ये दिवसाला ४ हजार ५९३ खर्रे खालले जातात, असे आढळले. याचा दिवसाचा खर्च ४६ हजार ३३२ रुपये होतो. तर महिन्याला १३ लाख ९८ हजार ८६० आणि वर्षाला १६ गावांचा खर्च १ कोटी ४३ लाख २४ हजार ५२० एवढा प्रचंड होतो, असे स्पष्ट झाले. ही माहिती सोळाही गावातील सूचना फलकावर लिहिण्यात आली आहे.मी खर्रा आणून देणार नाही..!खेड्यांमध्ये लहान मुलांना खर्रा आणण्यासाठी पानठेल्यांवर पाठविताना आजही पालकांना गैर वाटत नाही. मात्र, बालपंचायतीने सर्वे करताना त्यावर तोडगा शोधला. प्रजासत्ताक दिनी या सोळाही गावांतील मुलांनी ‘यापुढे मी खर्रा आणून देणार नाही’ अशी शपथ घेतली. पालकसभेपुढे याबाबत माहिती दिली. त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे.