निश्चलसिंह गौर ल्ल डोंगरखर्डा कळंब तालुक्यातील नांझा गावालगतच्या एका शेतात शुक्रवारी सकाळी शेकडो आधार कार्ड आढळल्याने एकच खळबळ उडाली. २०१३ साली काढलेले सदर आधार कार्ड असून या बाबत गावकऱ्यांनी पोस्टाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.नांंझा येथील एक गुराखी शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेतात गुरे चारण्यासाठी गेला होता. त्यावेळी संजय मुंडाली यांच्या शेतात एका ठिकाणी शेकडो आधार कार्ड पडून असल्याचे दिसून आले. त्यांनी ही बाब तत्काळ गावकऱ्यांना सांगितली. गावकऱ्यांनी या शेताकडे धाव घेतली असता गावातील नागरिकांसह नांझा पोस्टाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या इतरही गावातील आधार कार्ड तेथे पडून असल्याचे दिसून आले. या प्रकरणी गावकऱ्यांनी रोष व्यक्त करीत गावातील पोस्टमन सुभाष तुरणकर याला जाब विचारला. मात्र तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. तसेच पोस्ट मास्तर कांचन भोयर यांनाही याबाबत विचारणा केली. परंतु त्याही समाधानकारक उत्तर देऊ शकल्या नाही. त्यामुळे येथील नागरिकांनी यवतमाळ येथील सहायक डाक अधीक्षक वाटाणे यांच्याकडे माहिती दिली. तसेच कळंब पोलीस ठाण्यालाही याबाबतची सूचना दिली. गत २०१३ मध्ये काढलेले आधार कार्ड नागरिकांना मिळाले नव्हते. त्यामुळे अनेक जण पोस्टात जाऊन चौकशी करीत होते. परंतु त्यांना आधार कार्ड आले नसल्याचे सांगितले जात होते. परंतु शुक्रवारी बेवारस आढळून आलेल्या या आधार कार्डामुळे पोस्टाचे बिंग फुटले. दरम्यान सहायक अधीक्षक वाटाणे यांच्याशी संपर्क साधला असता दोषींवर कारवाई करणार असल्याचे सांगितले.
शेतात आढळले शेकडो आधार कार्ड
By admin | Published: March 19, 2016 2:13 AM