जिल्हास्तरावरून कितीही उपाययोजना केल्याचे जाहीर होत असले तरी तालुकास्तरावर यंत्रणा ढेपाळली आहे. तालुक्यात पॉझिटिव्हिटी, मृत्युदर आणि हॉटस्पॉटची गावे वाढली आहेत. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत २४० पुरुष, १२४ महिलांच्या मृत्यूची नोंद शासकीय दप्तरी आहे. गतवर्षी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला मृत्यू तालुक्यातील साधूनगर येथील व्यापाऱ्याचा झाला होता. त्यानंतर साधूनगर हे कोविड हॉटस्पॉट बनले होते.
आता पुन्हा साधूनगर हॉटस्पॉट बनले आहे. तेथील बापलेकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. या ठिकाणी कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. मात्र, औषध विक्रेता प्रशांत गावंडे यांनी अशा काही गावांकरिता स्वतःच्या खर्चाने सॅनिटायझर, मास्क, आवश्यक औषधी पुरवण्याचे व गावातील स्वच्छता करण्याकरिता पुढाकार घेण्याचा प्रस्ताव प्रशासनासमोर ठेवला होता; परंतु तालुकास्तर व विभागीय स्तरावरील प्रशासनाने त्यांच्या प्रस्तावाला गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे सामाजिक संघटना, विविध अन्नदाते यांनी पुढाकार घेण्याचे टाळले आहे.
महागाव, सवना, फुलसावंगी, गुंज, सुधाकरनगर, वरोडी, अंबोडा आणि पोहंडूळ आदी गावे कोरोना व सारी आजाराचे हॉटस्पॉट बनले आहे. तशी नोंद शासकीय दप्तरी आहे. तालुक्यातील नागरिकांचे शेकडो मृत्यू पुसद, यवतमाळ, नांदेड व अन्य ठिकाणी झाले आहे. संसर्गजन्य आजार, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, सारीचे रुग्ण गावागावांत ताप, खोकला, अंगदुखी, सर्दी, पडशामुळे फणफणत आहेत.
बॉक्स
कोविड सेंटरमध्ये सुविधांचा अभाव
आत्तापर्यंत तालुक्यात २२ हजारजणांची चाचणी करण्यात आली. सध्या ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण २०० आहेत. तालुक्यातील रुग्णांकरिता येथील तालुका ग्रामीण रुग्णालय इमारतीमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले. या ठिकाणी आवश्यक सोयी सुविधा पुरवण्यात आल्या नाहीत. दोन-दोन, तीन-तीन दिवस साधे पाणी मिळत नाही.