पांढरकवडा : तालुक्यातील कापूस, सोयाबीन, तूर आदी खरिपातील पिके समाधानकारक असताना रोही, रानडुकरे आदी वन्यप्राणी शेतात घुसून पिकांचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे आम्ही शेती करावी तरी कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
कधी ओला दुष्काळ, तर कधी कोरडा दुष्काळ आणि पावसाचा अनियमितपणा आदींचा सामना करीत असलेल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्ज काढून आपली शेती उभी केली. तालुक्यात मृग नक्षत्रात पावसाचे आगमन झाल्याने व नंतरही समाधानकारक पाऊस झाल्याने कापूस, सोयाबीन, तूर ही खरिपातील पिके डोलू लागली. असे असतानाच तालुक्यातील वाऱ्हा कवठा, भाडउमारी, वांजरी, सुन्ना, ढोकी, बल्लारपूर, साखरा, बोथ, बहात्तर या परिसरासोबतच आता सखी, वाढोणा, करंजी, अडणी, वाठोडा, चनाई, खातारा, सिंगलदीप परिसरातदेखील रानडुकरांचे कळपच्या कळप शेतात घुसून शेतमालाची नासधूस करीत आहेत. या वन्यप्राण्यांच्या धुमाकूळाने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. याबरोबरच रानडुक्कर व इतर हिंस्त्र वन्यप्राण्यांच्या शेतकऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. जखमी शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला मिळणे दुरापास्त झाले आहे. मागील दीड वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेक शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान, पशुधनाची हानी झाली आहे. हिरव्याकंच पिकात धुमाकूळ घालणाऱ्या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहेत.
बॉक्स : टिपेश्वर अभयारण्याला संरक्षक भिंत हवी
टिपेश्वर अभयारण्याला लागून सुन्ना, कोपामांडवी, अंधारवाडी, कोबई, वाऱ्हा, कवठा, बल्लारपूर, वांजरी, अर्ली, पिंपळशेंडा, पिटापुंगली, कारेगाव बंडल, दर्यापूर, वडवाट, धरमगोटा व झरी तालुक्यातील पिवरडोल, मांडवी, जुनोनी पोड व परंबा कारेगाव आदी गावात वाघांची प्रचंड दहशत आहे. टिपेश्वर अभयारण्याला संरक्षक भिंत नसल्याने वन्यप्राणी सहजपणे शेतकऱ्यांच्या शेतात येतात आणि काम करीत असलेल्या शेतकरी व शेतमजुरांवर हल्ला करतात. तसेच जनावरेसुद्धा फस्त करतात. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर कामावर जाण्यास धजावत नाहीत. त्यामुळे टिपेश्वर अभयारण्याला संरक्षक भिंत असणे गरजेचे आहे.