नगरपरिषद क्षेत्र : मतदार प्रारूप यादीत घोळ, अर्ज ठरले व्यर्थयवतमाळ : नगरपरिषद क्षेत्रातील मतदारयादीत घोळ असल्याची व नवी नावे समाविष्टच झाली नसल्याची ओरड राजकीय गोटातून ऐकायला मिळत आहे. निवडणूक प्रशासनाने मात्र असा कोणताही घोळ झाल्याची बाब स्पष्टपणे नाकारली आहे. त्याचवेळी बोगस नावे वगळल्याचे मान्यही केले आहे. जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांची लवकरच निवडणूक होऊ घातली आहे. त्यासाठी मतदारांच्या यादीला अंतिम स्वरूप देण्यात येत आहे. मतदारांना आपली नावे नोंदविण्यासाठी ३१ आॅगस्ट ही अखेरची तारीख देण्यात आली होती. त्याबाबत जिल्हाभर जनजागृतीही निवडणूक विभागाकडून करण्यात आली. निवडणूक आखाड्यात उतरण्यासाठी इच्छूक असलेल्या संभाव्य उमेदवारांनीसुद्धा अधिकाधिक मतदारांची नावे यादीत समाविष्ट करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. राजकीय पक्षांनीही आपले कार्यकर्ते त्यासाठी कामाला लावले होते. कार्यकर्त्यांनी घरोघरी जावून अर्ज भरून घेतले. तर काही नागरिकांनी स्वत:हून अर्ज भरून बुथवर बीएलओच्या स्वाधीन केले. अगदी अखेरच्या दिवसापर्यंत हे अर्ज मोठ्या संख्येने दिले गेले. त्यात नवीन मतदारांसाठीच्या फॉर्म नं.६ सोबतच स्थलांतरित झालेल्यांनी फॉर्म नं.७ भरून दिला. निवडणूक विभागाने प्रारूप यादी जाहीर केली. मात्र या यादीत कित्येकांची नावेच समाविष्ट झाली नसल्याची ओरड सुरू झाली आहे. पुढील दोन-चार दिवसात ही ओरड आणखी वाढण्याची शक्यता आहे. शनिवारी पुरवणी प्रारूप यादी प्रसिद्ध झाली. त्यातसुद्धा अनेकांची नावे समाविष्ट झाली नाही. सर्वच नगरपरिषद क्षेत्रांमध्ये ही ओरड ऐकायला मिळते. एकट्या यवतमाळ शहरात हा आकडा हजारोंच्या तर आर्णीसारख्या नगरपरिषद क्षेत्रात तो शेकडोच्या घरात असल्याचे सांगण्यात येते. अन्य नगरपरिषदांमध्येसुद्धा अशीच ओरड ऐकायला मिळते. निवडणूक विभागाने नेमलेले बीएलओ अखेरच्या दिवसापर्यंत अर्जच गोळा करत राहिले, त्यांना नव्या मतदारांची नावे वेळेत फिड करता आली नाही. त्यातच निवडणूक आयोगाने २४ तासानंतर वेबसाईट बंद केल्याने ही नावे अपलोड होवू शकली नाही. पर्यायाने ही नावे मतदारयादीतून बाहेरच राहिली. (जिल्हा प्रतिनिधी)
शेकडो नवे मतदार राहिले यादीबाहेरच
By admin | Published: September 18, 2016 1:18 AM