‘पीओपी’ मूर्तीला मागणी : दरात २० ते ३० टक्क्यांची वाढ प्रकाश सातघरे दिग्रस गणेश उत्सवाचा काळ म्हणजे मूर्तीकारांसाठी सुगीचे दिवस. एका हंगामात वर्षभराची तजविज केली जायची. मात्र आलिकडे प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तीनी जागा घेतली. कमी वेळात तयार होणाऱ्या, स्वस्त व आकर्षक मूर्ती भक्तांना बाजारात मिळू लागल्या. त्यामुळे स्थानिक मूर्तीकारावर उपासमारीचे वेळ आली आहे. त्यातच माती, रंग आणि मजूरीचे दर वाढ्याने मूर्तीच्या किमतीतही २० ते ३० टक्क्यांची वाढ झाली आहे.दिग्रस शहरवासीयांचा आवडता सण म्हणजे गणेशउत्सव होय. या सणाची अनेकजण आतुरतेने वाट पाहत असतात. यावर्षी बाप्पाला महागाईची झळ बसण्याची शक्यता आहे. गणेशमूर्ती बनविण्यासाठी आवश्यक असलेली माती, रंगांच्या किंमतीत वाढ झाल्याने गणेश मूर्ती महागणार असल्याचे मूर्तीकार सांगत आहेत. मातीच्या एका टॅक्टरला दोन ते तीन हजारांऐवजी यंदा पाच ते सहा हजार रुपये मोजावे लागत आहे. रंगाच्या किंमतीतही वीस ते बावीस रुपये पावकिलो मागे वाढ झाली आहे. शहरी भागात मातीच्या मूर्तीला मागणी आहे. मात्र बाहेरचे मूर्तीकार पैशाच्या हव्यासापोटी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती तयार करीत आहेत.सदर मूर्ती पहावयास सुंदर वजनाने हलक्या असल्याने ग्राहक त्यांना पसंती देतात. प्लास्टर आॅफ पॅरिसपासून पर्यावरणाला धोका उद्भवतो अशा मूर्तीवर बंदी आणून ग्रामीण व शहरातील मूर्तीकारांना न्याय द्यावा, अशी मागणी तालुक्यातील मूर्तीकारांनी केली आहे. दिग्रस तालुक्यात कुंभार मूर्ती कलावंत २० ते २५ आहेत. १२ महिन्यातून दोन महिने मूर्ती तयार करुन उदरनिर्वाह करणे हा त्यांचा पिढ्यानंपिढ्या चाललेला व्यवसाय आहे. मात्र त्यांच्यावर यंदा उपासमारीची वेळ आली आहे.
मूर्तीकारांवर उपासमारीचे संकट
By admin | Published: September 03, 2016 12:35 AM