- नरेश मानकरपांढरकवडा (यवतमाळ) - १३ निष्पापांचे बळी घेणारी अवनी वाघिण तब्बल दीड महिन्यांपासून वन विभागाच्या पथकाला चकवा देत होती. प्रशिक्षीत हत्ती, श्वान पथक, पॅरा ग्लायडर यांनाही तिचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर अनुभवी अधिका-यांनी क्लुप्ती योजली. नागपूरच्या महाराज बागेतून दुस-या वाघिणीचे मूत्र आणून जंगलात शिंपडले. कशालाच दाद न देणारी अवनी निसर्गनियमानुसार त्या वासावर आली आणि शार्पशुटरनी तिचा वेध घेतला.नरभक्षक झालेल्या अवनीला जेरबंद करण्याची मोहिम युद्धस्तरावर सुरू होती. मध्यप्रदेशातून हत्ती आणले, प्रसिद्ध शार्पशुटर बोलविण्यात आले. हवाई शोध घेण्यासाठी पॅराग्लाईडर आणण्यात आले. इटालीयन कुत्रेसुद्धा आणण्यात आले होते. शेवटी वाघिणीचे मूत्रच उपयोगी ठरले. मुत्राच्या वासामुळे कधीकधी ती झुडूपाबाहेर येत होती. कॅमेरामध्येही ती ट्रॅप झाली. तिच्या पाऊलखुणाही आढळून आल्या होत्या. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास वाघीण बोराटी जंगल परिसरात दुस-या वाघिणीच्या मूत्राचा शोध घेत वाघडोटा पुलाजवळ आली आणि शार्पशुटर असगर अली खान याने नेम धरून गोळी झाडली व ती धारातीर्थी पडली. पांढरकवडा वनविभागाच्या उपवनसंरक्षक के. अभर्णा यांना भ्रमणध्वनीद्वारे ही माहिती देण्यात आली. पहाटे ४.३० वाजेपर्यंत तब्बल पाच तास पंचनामा करून मृतदेह नागपूर येथे शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला.वाघिणीला बेशुद्ध करण्याचा भरपूर प्रयत्न केला गेला. परंतु ती चवताळून पथकावर चाल करून आली. त्यामुळे तिला ठार केल्याशिवाय पर्याय नव्हता, असे पांढरकवडा विभागाचे उपवनसंरक्षक के.एस.अभर्णा यांनी सांगितले.बेशुद्धीचा प्रयत्न झालाच नाहीवाघिणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झाला की नाही, की तिच्यावर सरळ गोळ्याच घालून ठार मारण्यात आले, याबाबत संभ्रम आहे.वाघिणीच्या मृत शरिरात बेशुद्ध करण्यासाठी वापरण्यात आलेला डार्ट आढळून आला. परंतु तो मृत झाल्यावर तिच्या शरिरात खुपसण्यात आल्याचा दावा वन्यजीव प्रेमींनी केला आहे.तब्बल दीड महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर ठार मारण्यात आलेल्या नरभक्षक वाघिणीचे ११ महिन्यांचे दोन बछडे अद्यापही शोधपथकाच्या दृष्टीस पडले नाही. त्यांना कसे जेरबंद करायचे हा गहन प्रश्न आता वनविभागासमोर निर्माण झाला आहे.आई दिसली नाही, तर हे बछडे अधिक आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त असून त्यातून पुन्हा मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे.
अवनीच्या शिकारीसाठी महाराज बागेतील दुसऱ्या वाघिणीचे मूत्रच ठरले उपयोगी! बछड्यांचे काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2018 4:49 AM