- योगेश पडोळेपांढरकवडा (यवतमाळ) - सुन्ना येथील विष्णु ईस्तारी आगीलवार यानं चितळ हरणाची शिकार केल्याप्रकरणी पांढरकवडा वनविभाग आणि वन्यजीव विभागाने त्यांच्याविरोधात संयुक्त कारवाई केली आहे. आरोपीच्या घरातून दहा किलो मांस जप्त करण्यात आले आहे. वन्यजीव व पांढरकवडा वनपरिक्षेत्र पांढरकवडा विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी विष्णु ईस्तारी आगीलवार (वय 48 वर्षे) सुन्ना यांनी 10 जानेवारीच्या रात्री चितळ हरणाची शिकार केली. शिवाय, काही मांसाची घरुन विक्री करण्यात आली.
याबाबतची माहिती मिळताच सापळा रचून प्रादेशिक विभाग आणि वन्यजीव विभागाने आरोपीच्या घरुन 10 किलो कच्चे मांस आणि काही शिजलेले मास मांस ताब्यात घेतले. सुन्ना येथून टिपेश्वर अभयारण्य जवळच लागून असल्याने या भागात तृणभक्षी वन्य प्राण्यांची संख्या भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळेच या भागात वाघाचे अस्तित्व टिकून आहे. परंतु मानवाने वन्यप्राण्यांच्या क्षेत्रात पूर्वीपासूनच हस्तक्षेप चालवलेला आहे. याचाच परिणाम स्वरूप आज वन्यप्राणी गाव वस्त्यांकडे चाल करत आहे.
आरोपी विष्णु ईस्तारी आगीलवार यानं पहिल्यांदाच शिकार केली की तो सराईत शिकरी आहे?, याची चैकशी वनविभाग करत आहे. ही कार्यवाही उपवनसंरक्षक के. अभर्णा आणि विभागीय वन अधिकारी वन्यजीव टी. बी. पंचभाई यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी केली आहे.