राळेगाव (यवतमाळ) : शेतातून घरी परतताना नदी पार करण्याच्या प्रयत्नात पती-पत्नीचा वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास वरूड (जहागीर) येथे घडली. हे दाम्पत्य पिकाची रखवाली करण्यासाठी जागलीला गेले होते.
सुभाष मारूती राऊत (५५) व सुलोचना सुभाष राऊत (५०) अशी जलसमाधी मिळालेल्या मृतांची नावे आहेत. बुकई शिवारात त्यांचे शेत आहे. जंगलाला लागून असलेल्या या शेतातील पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे, यासाठी ते रविवारी शेतात जागलीला गेले होते. सोमवारी सकाळी गावाकडे परतत होते. रात्रभर पाऊस झाल्याने मार्गात असलेल्या नदीला पाणी वाढले.
नदीच्या पाण्याचा अंदाज त्यांना आला नाही. त्यामुळे दोघांनीही पाण्यातून निघण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रवाह वाढल्याने दोघेही वाहून गेले. काही अंतरावर या दोघांचेही मृतदेह झाडाला अडकले होते. या प्रकाराची माहिती होताच गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांना माहिती देण्यात आली. गावकऱ्यांच्या मदतीने सुभाष मारूती राऊत व सुलाेचना सुभाष राऊत यांचे मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी रवाना करण्यात आले. त्यांच्यामागे दोन मुले, मुलगी व मोठा आप्त परिवार आहे. राऊत यांच्याकडे सहा एकर शेती आहे. वरूड तलावाच्या वेस्टवेअरच्या पाण्याने नदीचा प्रवाह वाढला होता.