- विलास ताजने
शिंदोला(यवतमाळ) : गेल्या वर्षीपासून बापूच लगीन कराचं होत... पण ह्या कोरोनामुळे बापूची नोकरी गेली...अन् बापू गावाला आला... नोकरी नाही, कामधंदा नाही...म्हणून बापूच लगीन जुळतं नाय... अशाप्रकारचे संवाद वाणीसह जिल्हाभरात ग्रामीण भागातील उपवर मुलांच्या आईवडिलांकडून ऐकू येत आहेत. कोरोनामुळे नोकरी गेल्याने मुलांचे लग्न जुळणे कठीण झाले आहे. म्हणून उपवर पित्यांना सुनबाई शोधण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
लग्न जोडणी म्हटलं की, पूर्वी शेतीला महत्वाचे स्थान होते. वर मुलगा काय करतो, यापेक्षा मुलाकडे किती शेती आहे. कुटुंब कसे आहे, त्याची गावात प्रतिष्ठा कशी आहे, मामकुळ कोणतं ? या बाबींना महत्त्व दिलं जायचं. मात्र आता काळानुरूप यात बदल झाला आहे. मुलगा शेती करतो, असे सांगितले की मुलीच्या कुटुंबाकडून प्रतिसाद मिळत नसल्याची वास्तविकता आहे. व्यसनाधीन, भूमिहीन, अल्पभूधारकच नव्हे तर शेतकरी तरूणांची लग्न न जुळण्याची मोठी सामाजिक समस्या गेल्या काही वर्षांपासून निर्माण झाली आहे. अशातच गेल्या वर्षापासून लागलेल्या कोरोनारूपी ग्रहणामुळे शहरात छोटी मोठी नोकरी करणाऱ्या तरूणांच्या नोकऱ्या गेल्या. परिणामी नोकरदार तरूण मुळगावी परतले. यामुळे बेरोजगारीत भर पडली. याचा परिणाम भावी नवरदेवांच्या लग्नावर झाला आहे. 'नाही हाती काम धंदा, म्हणून लग्नाचा झाला वांदा' अशा कोंडीत अनेक तरुण सापडले आहेत. प्रत्येक आईवडिलांना आपली मुलगी सुखी घरी पडावी अशी अपेक्षा असते. नोकरीत असलेल्या मुलांना अधिक पसंती दिली जाते. मात्र, गरीब असो वा श्रीमंत शेतकरी मुलाला मुलगी देण्यास आईवडील मागेपुढे पाहतात. कोरोनाच्या संकटामुळे अनेक तरूण मोठ्या शहरातून गावात आले. काही तरूण पुन्हा शहरात परत गेले. मात्र, कोरोनाच्या काळात निर्माण झालेल्या नोकरीच्या अनिश्चित सावटामुळे बरेच युवक खेड्यातच रमले. शेती किंवा अन्य व्यवसाय करू लागले. तथापि सद्यस्थितीत उपवर मुलींची संख्या कमी असल्याने तरूणांचे लग्न जुळणे कठीण झाले आहे. परिणामी उपवर मुलांच्या वडिलांची फारच दमछाक होत आहे. लग्नाचं वय झालेली मुलं अविवाहित राहण्याची चिंता अनेक मुलांच्या पालकांना सतावत असल्याची वास्तविकता आहे.