यवतमाळ : पती रोजमजुरीचे पैसे घरी देत नाही, अशा स्थितीत पतीसोबत संसार करायचा कसा, असे म्हणून पत्नी माहेरी गेली. तिने सोबत सात वर्षांच्या मुलाला नेले. मात्र, काही दिवसांतच पती मुलाला घेऊन आपल्या गावी कोलुरा येथे परत आला. या मुलाला घेण्यासाठी मंगळवारी पत्नी पोहोचली. यावरून पती-पत्नीत वाद झाला. संतापलेल्या पतीने पत्नीला डांबून लोखंडी गजाने मारहाण केली. ती अर्धमेली झाल्यानंतर घराबाहेर फरफटत काढले. यातच तिचा मृत्यू झाला.
शुभांगी विजय जांभोरे (२७, रा.फ्रेजरपुरा, अमरावती) असे मृत महिलेचे नाव आहे. शुभांगीचा कोलुरा येथील विजय दामोधर जांभोरे (४०) याच्याशी विवाह झाला. हे दोघेही पती-पत्नी अमरावती येथे राहात होते. मात्र, विजय मजुरीचे पैसे घरी देत नव्हता. यावरून नवरा-बायकोत वाद झाला. त्यानंतर, विजय हा कोलुरा येथे त्याच्या आईसोबत राहात होता. काही दिवसांपूर्वी विजयच्या आईने सात वर्षीय नातवाला कोलुरा येथे आणले होते. त्याच मुलाला घेण्यासाठी शुभांगी, तिची आई जयश्री सुखदेवे यांना घेऊन मंगळवारी दुपारी कोलुरा येथे आली होती. मुलाची बॅग भरत असतानाच, विजय घरी पोहोचला. त्याने पत्नी शुभांगीशी वाद घालत तिच्यावर लोखंडी गजाने हल्ला चढविला, नंतर रक्तबंबाळ अवस्थेत फरफटत शुभांगीला घराबाहेर काढले.
हा प्रकार शुभांगीची आई जयश्री पाहत होती. तिने विजयच्या तावडीतून शुभांगीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, विजय चवताळून जयश्रीच्या मागे धावू लागला. जिवाच्या आकांताने शुभांगीची आई जयश्री आरडाओरडा करत पळू लागली. शुभांगीचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच, विजय भानावर आला व त्याने घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी नेर पोलिसांनी जयश्री सुखदेवे यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध नेर पोलीस घेत आहेत.