कैलाश प्रल्हाद चव्हाण, असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव आहे. १७ सप्टेंबर २०१६ रोजी चिली (इजारा) येथे आरोपी कैलाश चव्हाण याने पत्नी वंदना हिचा खून केला होता. मृतक वंदना हिचे लग्न गावातीलच आरोपी कैलाश चव्हाणसोबत २००० मध्ये झाले होते. त्यांना दोन मुले आहे. लग्नानंतर ते पुणे येथे काम करण्यासाठी गेले होते. तेथे वंदनाच्या चारित्र्यावर संशयातून कैलाश वाद करीत होता. वंदनाचा शारीरिक व मानसिक छळ करीत होता. घटनेपूर्वी ८ दिवस अगोदर कैलाश वंदना व मुलांसह चिली येथे आला होता. १७ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी ९.३० वाजता त्याने वंदनाला दारू प्राशन करून मारहाण केली. जीवाने मारण्याची धमकी दिली. याबाबत वंदनाने महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
त्या दिवशी सायंकाळी कैलाश मेव्हणा दयानंद जाधव यांच्याकडे थांबला. रात्री ९ वाजता त्याने वंदना, दोन मुले, मेव्हणा दयानंद व त्याची पत्नी सविता या सर्वांनी सोबत जेवण केले. नंतर कैलाश अंगणात, तर वंदना मुले, भावजय संगीता, तिच्या मुलांसह घरात झोपले. दयानंद गावातील मित्राकडे झोपण्यासाठी गेला. रात्री ११.४५ वाजताच सुमारास कैलाशने मेहुण्याची पत्नी संगीताला पिण्याचे पाणी मागितले. संगीता पाणी आणण्यासाठी स्वयंपाक खोलीत गेली असता तो घरात शिरला व झोपून असलेल्या पत्नी वंदनाच्या छातीवर बसून विळ्याने वार केले. वंदनाने आरडाओरडा केल्यानंतर मुले जागी झाली. पाणी घेण्याकरिता गेलेली संगीताने वंदनाची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कैलाशने तिच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात वंदना मरण पावली.
घटनेनंतर दयानंद जाधव याने १८ सप्टेंबरला महागाव ठाण्यात तक्रार दिली. तत्कालीन पोलीस निरीक्षक पी.बी. शेळके यांनी तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे ८ साक्षीदार तपासण्यात आले. साक्ष देताना मुलांनी वडिलांना शिक्षा होऊ नये, असे वाटत असल्याचे सांगितले. आरोपीने पत्नीचा खून केल्याचे मान्य केले.
या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.वाय. फड यांनी आरोपीला भादंवी कलम ३०२ नुसार जन्मठेप व १० हजार रुपये दंड ठोठावला. तसेच नामे संगीता जाधवला जखमी केल्याप्रकरणी भादंवि कलम ३२४ नुसार तीन वर्ष शिक्षा व १० हजार दंड आणि दंडाची रक्कम जखमी सविताला नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला. दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिन्यांची अतिरिक्त शिक्षा ठोठावली. शासनातर्फे सरकारी वकील ॲड. महेश निर्मल यांनी बाजू मांडली. या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून सचिन कांबळे यांनी काम पाहिले.