घाटंजी (यवतमाळ) : पत्नीला मानसिक व शारीरिक त्रास देऊनही ती जुमानत नाही. अनेकदा तिला बेदम मारहाणही करण्यात आली. या जाचाला त्रासूनही पत्नी वडिलांकडून पाच लाख रुपये आणत नाही असे लक्षात येताच पतीने पत्नीला चक्क धमकी दिली. त्या क्षणाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल करून बदनामी करेन, समाजात तोंड दाखवायच्या लायकीची ठेवणार नाही, अशा प्रकारची धमकी पतीने दिली. हे सर्व असह्य झालेल्या पत्नीने घाटंजी पाेलीस ठाण्यात तक्रार दिली.
श्रीकांत उर्फ भूपेंद्र दादाराव आडे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे. घाटंजी तालुक्यातील चोरकुंड येथील मुलीचा २०१९ मध्ये आर्णीतील भूपेंद्र आडे याच्याशी विवाह झाला. बोलणी झाल्याप्रमाणे अडीच लाख हुंडा, सोन्याचे दागिने देण्यात आले. मात्र, काही महिन्यातच प्लॉट घेण्यासाठी पाच लाखांची मागणी होऊ लागली. यात पतीसोबत त्याचे आई-वडील, बहिणीसुद्धा त्रास देऊ लागल्या.
सासरच्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढतच चालला होता. पैशांचा तगादा लावत पती बेदम मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास देत होता. इतका त्रास देऊनही माहेरून पैसे आणत नाही म्हणून त्याने तिला 'त्या' क्षणाचे फोटो व्हायरल करून बदनामी करेन अशी धमकी दिली. अखेर जाच असह्य झाल्याने महिलेने माहेर गाठले व घाटंजी पोलीस ठाण्यात शुक्रवारी तक्रार दिली. या गुन्ह्याचा अधिक तपास घाटंजी ठाणेदार मनीष दिवटे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.