पुसद तालुक्यातील घटना : जिल्हा व सत्र न्यायाधीशांचा निकाल
पुसद : विवाहितेला मारहाण करून व जाळून जीवे मारल्या प्रकरणात आरोपी पती व सासऱ्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी. गावंडे यांनी मंगळवारी हा निर्णय दिला. अमोल देशमुख व विजय देशमुख अशी यातील आरोपींची नावे असून, छाया अमोल देशमुख असे मृत महिलेचे नाव आहे.
तालुक्यातील गौळ (बु.) येथे १५ सप्टेंबर २०१२ मध्ये ही घटना घडली होती. मृत छाया हिचे लग्न आरोपी अमोल देशमुखसोबत २००९ मध्ये झाले होते. मात्र चारित्र्यावर संशय घेऊन पती अमोल देशमुख, सासरा विजय व सासू अन्नपूर्णाबाई छायाचा छळ करीत होते. घटनेच्या दिवशी छायाने तिच्या आईस फोन करून याबाबत माहिती दिली. परंतु त्याच रात्री ११ वाजता छाया जळाल्याची माहिती फोनवरून छायाच्या काकास देण्यात आली. या प्रकरणात छायाचे काका तानाजी चव्हाण यांच्या तक्रारीवरून पोफाळी पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि ३०२ नुसार गुन्हा नोंद केला. शवविच्छेदन अहवालामध्ये मृत्यूपूर्वी मारहाण झाल्याचे आढळून आले. तसेच शरीरावर मारहाणीच्या, गळा दाबल्याच्या खुणा मिळून आल्या. जिवंतपणीच तिला केरोसीन टाकून जाळल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले. सहायक पोलीस निरीक्षक डी. सी. राठोड यांनी साक्षीदारांचे बयान नोंदवून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली. परिस्थितीजन्य पुरावा व वैद्यकीय अधिकारी शरद कुचेवार यांची साक्ष, सरकारी वकील महेश निर्मल यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी पती अमोल देशमुख आणि सासरा विजय देशमुख यांना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली, तर सासू अन्नपूर्णाबाई हिला निर्दोष मुक्त केले. सदर प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेड काॅन्स्टेबल दिलीप राठोड व पोलीस काॅन्स्टेबल राहुल मार्कंडे यांनी काम पाहिले.
बाॅक्स
आरोपींचा ‘तो’ मुद्दा अपयशी
या प्रकरणात आरोपीने बचावासाठी वेगळाच मुद्दा पुढे केला होता. गावातील एका इसमाविरुद्ध मृत हिने पूर्वी जीवाला धोका असल्याची तक्रार दिली होती. त्या इसमानेच खून केला असल्याची शक्यता व्यक्त करीत आरोपीने बचावात्मक पवित्रा घेतला होता. परंतु त्याबाबतीत आरोपी ठोस पुरावा सादर करू शकले नाही.