मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : मोफत औषधोपचार व आरोग्याची दर्जेदार सुविधा पुरविण्याबाबत कितीही दावे केले जात असले तरी आजही गरिबांना आजारपण दूर करण्यासाठी घरदार विकावे लागत असल्याचे धडधडीत वास्तव सांगणारी परिस्थिती दारव्हा तालुक्यातील बानायत येथील एका कुटुंबावर ओढवली आहे. आजारी आईच्या उपचारासाठी पैसे नसल्याने मुलाने कुडाच्या झोपडीवरील टिन विकले. त्यामुळे हे मायलेक उघड्यावर आले असून कडाक्याच्या थंडीत कुडकुडत उपाशी तापाशी दिवस काढण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे.बानायत येथे पद्माबाई रामहरी खंडारे व मुलगा सुनिल हे दोघे कुडाच्या झोपडीत राहतात. पतीचे पूर्वीच निधन झाले. काही महिन्यांपूर्वी मोठा मुलगा आजारपणाने वारला. पद्माबार्इंचे वय झाले. तसेच त्या सतत आजारी राहतात. अशातच काही दिवसांपूर्वी काम काम करताना त्या पडल्या. त्यांचे हाड फ्रॅक्चर झाल्याने खाटेवरच आहे. त्यामुळे दोघांची रोजीरोटी व उपचाराची जबाबदारी मुलावर येऊन पडली. रोजमजुरी करून तो परिस्थितीशी संघर्ष करीत असताना स्वत:ही आजारी पडल्याने पैशाची आवकच बंद झाली. त्यामुळे घरात रुपयाही नसल्याने खायला अन्न नाही. त्यात दोघेही आजारी. अशा वाईट अवस्थेत गेल्या अनेक दिवसांपासून मायलेक दिवस काढत आहेत. अशातच आईची प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे औषधोपचारासाठी पैसे नसल्याने मुलाने झोपडीवरील टिन विकले. घरावरचे छत गेल्याने त्यांच्यावर सध्याच्या कडाक्याच्या थंडीत उघड्यावर जीवन जगण्याची पाळी आली आहे.यादीत नाव असताना घरकूल नाहीकुडाच्या घरात दिवस काढणाऱ्या पद्माबाई घरकुल योजनेसाठी पात्र लाीार्थी आहे. त्यांचे नाव यादीतसुद्धा आहे. तरी पण या बेघर कुटुंबाला घरकुल मिळाले नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने गरजू व पात्र कुटुंबाला न्याय न देणाºया यंत्रणेचे काळीज कोणत्या पाषाणाचे आहे, हे समजायला मार्ग नाही.आरोग्य विभाग उदासीनया गरीब कुटुंबातील दोघेही अनेक दिवसांपासून आजारी असताना आरोग्य यंत्रणेतील कुणीही त्यांच्याकडे ढुंकूनसुद्धा पाहिले नाही. शेवटी त्यांना घरावरचे टिन विकून उपचार करावा लागला. त्यामुळे ग्रामीण भागात आरोग्य सेवेचे काय हाल आहे हे यावरून दिसून येते.सामाजिक पुढाकाराची गरजपद्माबाई खंडारे आणि सुनिल खंडारे या मायलेकांची व्यथा शब्दापलीकडची आहे. परिस्थितीचा आघात, त्यात वडलांचे छत्र हरविलेले. अशात प्राणप्रिय आई आजारी अन् हाताशी पैसाच नाही... अशा कठीण प्रसंगात कोणताही माणूस खचून गेल्याविना राहणार नाही. पण सुनिल याही स्थितीत आईसाठी जीवाची बाजी लावतोय. त्याची आई आहे म्हणून त्यानेच खस्ता का खाव्या, समाज म्हणून आपलीही जबाबदारी आहेच. मग वाट कशाची बघावी? सुनिलच्या संघर्षाला थोडा दिलासा आणि थोडी आर्थिक मदत करण्याची गरज आहे. आईसाठी घर गमावण्याची ताकत सुनीलकडे आहे. पण समाजातून पारिवारिक मदत मिळाल्यास घरही वाचेल. दानशूरांनी पद्माबार्इंच्या उपचारासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आईच्या उपचारासाठी विकले झोपडीवरील टिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:08 PM
मोफत औषधोपचार व आरोग्याची दर्जेदार सुविधा पुरविण्याबाबत कितीही दावे केले जात असले तरी आजही गरिबांना आजारपण दूर करण्यासाठी घरदार विकावे लागत असल्याचे धडधडीत वास्तव सांगणारी परिस्थिती दारव्हा तालुक्यातील बानायत येथील एका कुटुंबावर ओढवली आहे.
ठळक मुद्देबानायतचे कुटुंब : कडाक्याच्या थंडीत कुटुंब उघड्यावर, उपासमारीची वेळ, रोजमजुरी करून संघर्ष