उमरखेड (कुपटी) : दहशतवादी संघटना आणि कारवायात सहभाग असल्याच्या संशयावरून उमरखेड येथील एका तरूणाला सिकंदराबाद येथे हैद्राबाद येथील दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली होती. दरम्यान सोमवारी पथक उमरखेडमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी संबंधित तरूणाच्या शहा कॉलनी येथील घराची झडती घेतली. मुदस्सीर शहा रा. शहा कॉलनी उमरखेड असे एटीएस पथकाच्या ताब्यात असलेल्या संशयीताचे नाव आहे. त्याच्यासोबत मराठवाड्यातील आखाडा बाळापूर येथील शोयेब खान या तरूणालाही सिकंदराबाद येथून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून हैद्राबाद येथील दहशदवाद विरोधी पथक या दोघांची चौकशी करीत आहे. तब्बल १४ दिवस चौकशी केल्यानंतर सोमवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास हैद्राबादचे एटीएस पथक उमरखेड येथे दाखल झाले. त्यांनी मुद्दसिर शहा उर्फ तल्ला याच्या घराची झडती घेतली. पोलीस अधीक्षक डी. हरीश कुमार यांच्या नेतृत्वातील सुमारे २५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही झडती घेतली. यावेळी मुद्दसीर शहा यालासुद्धा तेथे आणण्यात आले होते. मुद्दसिर हा येथील बसस्थानका शेजारी असलेल्या जे.के. कम्प्युटर अँड मोबाईल शॉप या दुकानात इंटरनेट हाताळायचा. या दुकानातील संगणकाचीसुद्धा पथकाने तपासणी केली. तेथील दोन हार्डडिस्क पोलिसांनी जप्त केल्या. मुद्दसिर आपल्या काकाकडे असलेल्या संगणकावर देखील काम करायचा. त्या संगणकाची हार्डडिस्कही जप्त करण्यात आली. झडती दरम्यान मुद्दसिरला त्याच्या नातेवाईकांना भेटू दिल्या गेले नसल्याची माहिती ठाणेदार शिवाजी बचाटे यांनी दिली. (वार्ताहर)
हैदराबाद एटीएसची उमरखेडला घरझडती
By admin | Published: November 04, 2014 10:47 PM