पंतप्रधानांची भेट : ‘लोकमत’ने दिली संधीयवतमाळ : शाळेत शिकताना विमानात बसू असे स्वप्नातही वाटले नाही. मात्र ‘लोकमत’ने संधी दिली. पहिल्यांदा विमानात बसलो आणि धम्माल मजा आली. विमानप्रवास आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचा प्रसंग जसाच्या तसा डोळ्यासमोर आहे, अशा शब्दात यवतमाळच्या सृजन नरेश महाजन याने आपल्या हवाई सफरीचे अनुभव व्यक्त केले.लोकमत मीडिया प्रा.लि.च्यावतीने आयोजित ‘संस्काराचे मोती’ स्पर्धेंतर्गत निसर्ग सफारी या उपक्रमातून यवतमाळ येथील स्कूल आॅफ स्कॉलर्सचा सहावीचा विद्यार्थी सृजन महाजन याची हवाई सफरीसाठी निवड झाली. त्याने १० जुलै रोजी नागपूर-दिल्ली अशी हवाई सफर केली. विमानाने प्रवास करण्याची संधी मिळाल्याचे माहीत झाल्यापासून सृजन रोमांचित झाला होता. विमान कसे असते, विमानात कसे बसायचे असे अनेक प्रश्न त्याला पडत होते. मात्र नागपूर विमानतळावर आई, बाबांसोबत तो पोहोचला आणि पहिल्यांदा एकटा विमानात बसला. त्याच्या सोबतीला इतर विजयी स्पर्धक आणि ‘लोकमत’चे कर्मचारी होते. सीटबेल्ट बांधून विमान हवेत उडायला लागले तेव्हा धम्माल मजा आली. विमानातून ढग अगदी जवळ दिसत होते. त्याचे फोटोही मोबाईलमध्ये काढले. दिल्ली विमानतळावर पोहोचल्यावर मनाची धाकधूक जास्तच वाढली. उंच-उंच इमारती आणि चकचकीत रस्ते पहिल्यांदाच पाहात असल्याचे तो सांगतो.दिल्लीत पोहोचल्यावर एका बसने आम्ही राजधानीतील विविध वास्तू पाहिल्या. इंडिया गेट, राष्ट्रपती भवन पाहिल्यावर संसदेत दाखल झालो. मोठी गोल व उंच इमारत पहिल्यांदाच जवळून पाहिली. या ठिकाणी खूप गर्दी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मनाची आणखी धाकधूक वाढली. टीव्हीवर नेहमी दिसणारे नरेंद्र मोदी अगदी जवळून कसे दिसतात याची उत्सुकता होती. आम्ही एका खोलीत दाखल झालो. काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आलेत आणि त्यांनी चक्क मराठीतून ‘कसे आहात मुलांनो, कोठून आलात’ असे विचारले. आम्ही त्यांना परिचय दिला. एका लहान मुलाला जवळ घेवून त्याची विचारपूस केली. ‘लोकमत’मुळे आज हवाई सफरीसोबतच पंतप्रधानांना भेटण्याची संधी मिळाली, असे सृजन सांगतो. (नगर प्रतिनिधी)सृजनचा एसएमएसमुलाला आजपर्यंत कधीही एकट्याने प्रवासाला पाठविले नाही. पहिल्यांदाच तो विमानाने दिल्लीला जात होता. मनात थोडी भीती होती. परंतु ‘लोकमत’ची टीम सोबत असल्याने दिलासाही होता. सृजन विमानाने दिल्लीत पोहोचला आणि तेथून त्याचा ‘सेफ लँडींग, वूई हॅव रिच टू दिल्ली’ असा एसएमएस आला, असे सृजनच्या आई प्रा.ममता नरेश महाजन सांगत होत्या. विमान प्रवास, दिल्ली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झाली, या तीन गोष्टी ‘लोकमत’मुळेच सृजनला मिळाल्या, असे त्या सांगतात.
विमानात बसलो अन् धम्माल मजा आली
By admin | Published: July 12, 2014 11:54 PM