लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेले इचोरी गाव आजही प्राथमिक सोयीसुविधांपासून वंचित आहे. दीड हजार लोकसंख्येच्या या गावात पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागते. पाण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था व्हावी म्हणून नागरिकांनी आमदार, खासदार, जिल्हा प्रशासन यांच्याकडे शेकडो चकरा मारल्या. प्रस्ताव मंजूर झाला. सरकार बदलले आणि पाण्याची योजना थांबली. आजही या गावात नळ योजना नाही. हातपंप आणि एक सार्वजनिक विहीर त्यावरच पिण्याचे पाणी अवलंबून आहे. जानेवारीपासून पाण्याची पातळी कमी होते आणि गावात टँकर सुरू करावा लागतो. यावर्षीही अशीच परिस्थिती कायम राहिली आहे. यामुळे नागरिकांमध्ये निराशेचा सूर आहे.
राजकीय इच्छाशक्ती नसल्याने याेजनेस विलंब
गावासाठी मागच्या सरकारमध्ये पाईपलाईन मंजूर झाली होती. आता या योजनेसाठी पैसाच नाही. यामुळे गावाचे नळ योजनेचे स्वप्न धुसर झाले आहे. विद्यमान लोकप्रतिनिधींकडे हा विषय मांडण्यात आला. मात्र आजपर्यंत त्यावर कुठलाही तोडगा निघाला नाही.
आमच्या गावाला पाण्याचे सुख मिळालेच नाही. पावसाळ्यात किमान हातपंपावर पाणी भरता येते. मात्र जानेवारीपासून पाण्यासाठी पायपीट होते. रोजमजुरी करताना पाणी आणण्यासाठी जास्त वेळ काम करावे लागते. यानंतरही पुरेसे पाणी प्रत्येकाच्या घरी पोहोचत नाही. लहाण्यापासून मोठ्यापर्यंत सारेजण पाणीच आणत असतात. - रंजना ठोंबरे, गृहिणी
खनिज विकास निधी, राष्ट्रीय पेयजल योजना या माध्यमातून ग्रामपंचायतीने नळ योजनेसाठी प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केले. या प्रस्तावाला मंजुरीही मिळाली. मात्र सरकार बदलले आणि मंजूर झालेली योजनाही थांबली. त्यावेळी ५४ लाख रुपयांचे बजेट होते. आता हे बजेट ७७ लाखांवर पोहोचले आहे. मात्र कुठल्याही हालचाली नाही.- नीळकंठ बोरकर, सरपंच