अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्राची शैक्षणिक प्रगती देशात पहिल्या क्रमांकाची ठरावी यासाठी शिक्षण विभाग ना-ना ते उपाय करीत आहे. त्यातच आता राज्याचा ‘परफॉर्मन्स ग्रेडींग इन्डेक्स’ उंचावण्यासाठी शिक्षकांना अधिकृत ओळखपत्र दिले जाणार आहे. त्यासाठी तीन लाख ८६ हजार ८१८ ओळखपत्रे तयार करून वाटण्यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांचे कंत्राट देण्याच्या हालचाली सुरू आहेत.पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांना याच शैक्षणिक सत्रात ओळखपत्र देण्याबाबत राज्याच्या शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शुक्रवारी निर्देश दिले. विशेष म्हणजे, ओळखपत्र वाटपाचा हा निर्णय समग्र शिक्षा अभियानाच्या प्रकल्प मान्यता मंडळाच्या मे महिन्यातील बैठकीतच घेण्यात आला होता. मात्र त्यासाठी पैशांची तरतूद तब्बल अर्धे शैक्षणिक सत्र संपल्यानंतर करण्यात आली आहे.या निर्णयानुसार, केवळ शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि शंभर टक्के अनुदानित शाळांमधीलच शिक्षकांना ओळखपत्र दिले जाणार आहे. विनाअनुदानित किंवा अंशत: अनुदानित शाळेतील शिक्षकांना यातून वगळण्यात आले आहे. २०१७-१८ या सत्रातील यू-डायस आकडेवारीनुसार राज्यात पहिली ते आठवीपर्यंत शिकविणारे तीन लाख ८७ हजार १६४ शिक्षक आढळले आहेत. त्यामुळे प्रकल्प मान्यता मंडळाने प्रती ओळखपत्र ५० रुपये या दराने एक कोटी ९३ लाख पाच हजार ८२० रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र २०१८-१९ या सत्रात यू-डायस प्लसच्या सुधारित आकडेवारीनुसार राज्यात अशा शिक्षकांची संख्या तीन लाख ८६ हजार ८१८ इतकी आढळली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात एक कोटी ९३ लाख चार हजार ९० रुपये त्या-त्या जिल्ह्याकडे वळते केले जाणार आहे.जिल्हानिहाय शिक्षक व आयकार्ड निधीअमरावती १०६९६ शिक्षकांसाठी ५ लाख ३ हजार ४८०, बुलडाणा १०३७१ शिक्षकांसाठी ५ लाख १८ हजार ५५० रुपये, अकोला ६४२५ शिक्षकांसाठी ३ लाख २१ हजार २५० रुपये, वाशिम ५११६ शिक्षकांसाठी २ लाख ५ हजार ५८० रुपये, यवतमाळ १०९६९ शिक्षकांसाठी ५ लाख ४८ हजार ४५० रुपये, नागपूर १४०१२ शिक्षकांसाठी ७ लाख ६०० रुपये, वर्धा ४७२० शिक्षकांसाठी २ लाख ३ हजार ६०० रुपये, चंद्रपूर ८१६३ शिक्षकांसाठी ४ लाख ८ हजार १५० रुपये, गोंदिया ५४७४ शिक्षकांसाठी २ लाख ७ हजार ३७० रुपये, भंडारा ४५८० शिक्षकांसाठी २ लाख २ हजार ९०० रुपये, गडचिरोली जिल्ह्यातील ५४३८ शिक्षकांसाठी २ लाख ७ हजार १९० रुपये मंजूर करण्यात आले आहे. याच पद्धतीने राज्यभरातील ३ लाख ८६ हजार ८१८ शिक्षकांसाठी प्रत्येकी ५० रुपयांप्रमाणे निधी वळता करण्यात आला आहे.असे असेल ओळखपत्रशिक्षकांना ओळखपत्र मिळवून देण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकाºयांवर सोपविण्यात आली आहे. जिल्हा किंवा तालुका स्तरावरील संबंधितांकडून ही ओळखपत्रे तयार करून घेण्याचे निर्देश आहेत. या ओळखपत्रात पुढील बाजूस जिल्हा परिषद, महापालिका किंवा शिक्षण संस्थेचे नाव असेल. सोबतच शाळेचे नाव, शिक्षकाचे नाव असेल. शाळेचा यू-डायस क्रमांक, शिक्षकाचा फोटो, जन्मतारीख, रक्तगट, शिक्षकाची स्वाक्षरी, मुख्याध्यापकाची स्वाक्षरी असतील. तर आयकार्डच्या मागील बाजूस शालार्थ कोड, संपर्क क्रमांक, शिक्षकाचा ई-मेल आयडी असेल. मात्र कोणत्याही स्थितीत या आयकार्डवर ‘महाराष्ट्र शासन’ लिहू नये किंवा शासनाचा लोगो वापरू नये असे स्पष्ट निर्देश आहेत.
तीन लाख ८६ हजार शिक्षकांना देणार ओळखपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 12:50 PM
आता राज्याचा ‘परफॉर्मन्स ग्रेडींग इन्डेक्स’ उंचावण्यासाठी शिक्षकांना अधिकृत ओळखपत्र दिले जाणार आहे.
ठळक मुद्देकार्डसाठी २ कोटींचा ठेका कार्यक्षमता प्रतवारी सुधारण्यासाठी राज्य शासनाचे पाऊल