पुसद : मराठा सेवा संघ ही पुरोगामी विचारधारेची ढाल आणि विकृतीवर आक्रमकपणे वार करणारी तलवार आहे. सेवा संघामुळे महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये वैचारिक परिवर्तन घडले, असे प्रतिपादन व्याख्याते आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ता प्रा. प्रेमकुमार बोके यांनी केले.
येथील एका हाॅटेलच्या सभागृहात मराठा सेवा संघाच्या एकतिसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर व गुणवंतांच्या गुणगौरव कार्यक्रमात ते शनिवारी बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष प्रभाकर टेटर होते. उद्घाटक पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा नियोजन विकास समिती सदस्य सुधीर देशमुख, नगरसेवक राजू सोळंके, शिवाजीराव देशमुख सवनेकर, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर जगताप, संभाजी ब्रिगेड प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर देशमुख आदी उपस्थित होते.
सुरुवातीला राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. आसावरी पवार हिने जिजाऊ वंदना सादर केली. पहिल्या सत्रात प्रा. बोके यांनी मराठा सेवा संघामुळे ३१ वर्षांत विविध क्षेत्रांत झालेले परिवर्तन, इतर पुरोगामी चळवळींना झालेला फायदा, बहुजन समाजामध्ये झालेली जागृती, रचनात्मक कामे आदींचा ऊहापोह केला.
द्वितीय सत्रात ‘संघटन का व कशासाठी’ या विषयावर संघटनेचे उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, संघटनेचे प्रमुख घटक, विचारधारा, कार्यकर्त्यांचे महत्त्व, नेत्यांची जबाबदारी, व्यवस्था परिवर्तन, संघटनेमुळे अस्मितेची जाणीव व आत्मभान आल्याचे सांगितले. दरम्यान, मराठा सेवा संघाच्या दिवंगत पदाधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
समारोपीय सत्रात दहावी, बारावीतील गुणवंत गुणगौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी दिगंबर जगताप होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किरण सरनाईक, शरद मैंद, डॉ. विजय माने, अनिरुद्ध पाटील चोंढीकर, साहेबराव पाटील, रवींद्र महले उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा सन्मानचिन्ह, पुस्तक भेट देऊन गौरव केला.
बॉक्स
जिजाऊ सृष्टीसाठी दिली देणगी
जिजाऊ सृष्टीसाठी शरद मैंद यांनी एक लाख ११ हजार, सुधीर देशमुख यांच्या पुढाकारात दिग्रस सेवा संघाने ५१ हजार, तर संतोष ठाकरे यांनी ११ हजार रुपये दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. संचालन यशवंत देशमुख, आभार नितीन पवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रवीण कदम, जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्ष शुभांगी पानपट्टे, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे सुधाकर सरकचौरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.