धनज : अडीच फूट उंची, दर्शनासाठी गर्दी नेर : शेतात पाईपलाईनसाठी खोदकाम करताना कृष्णाची अडीच फूट उंचीची धातूची मूर्ती एका शेतकऱ्याला गुरुवारी सापडली. याची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी शेतकऱ्याच्या घरी दर्शनासाठी गर्दी केली आहे. धनज येथील शेतकरी रामदास नारायण सोहर आपल्या शेतात गुरुवारी पाईपलाईनसाठी खोदकाम करीत होते. त्यावेळी अचानक टणक काही तरी लागले. त्यांनी आणखी खोदकाम केल्यानंतर कृष्णाची अडीच फूट उंचीची मूर्ती आढळून आली. चांदीसदृश असलेली ही मूर्ती घेऊन त्यांनी गाव गाठले. याबाबत गावकऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर मूर्तीचा अभिषेक करून या मूर्तीची घरी स्थापना केली. दरम्यान ही मूर्ती नेमकी कोणत्या धातूची आहे, यासाठी त्यांनी सराफाला पाचारण केले. त्यांनी ही मूर्ती अष्टधातूची असल्याचे सांगितले. तसेच या प्रकारच्या मूर्त्या कर्नाटक, उत्तरप्रदेशात आढळत असल्याचे सांगितले. सदर मूर्ती ३० वर्षापूर्वीची असावी, असाही अंदाज वर्तविण्यात आला. कोण्यातरी मंदिरातून ही मूर्ती चोरट्यांनी चोरली असावी आणि भीतीतून त्यांनी शेतात लपवून ठेवली असावी, असाही कयास व्यक्त केला जात आहे. या मूर्तीची माहिती पंचक्रोषित होताच अनेकांनी सोहर यांच्या घरी दर्शनासाठी धाव घेतली आहे. विशेष म्हणजे धनज हे गाव फकीरजी महाराजांच्या देवस्थानासाठी विदर्भात प्रसिद्ध आहे. विविध सात मंदिरे असलेल्या या गावात केवळ श्रीकृष्णाचेच मंदिर नव्हते. आता ही मूर्ती आढळल्याने कृष्णाचे मंदिर बांधण्याचा मनोदय गावकऱ्यांनी व्यक्त केला. (तालुका प्रतिनिधी)
शेतातील खोदकामात श्रीकृष्णाची मूर्ती
By admin | Published: March 12, 2016 2:41 AM