लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : लग्न समारंभ, सण, उत्सव, यात्रा याशिवाय मोठ्या सभा अशा ठिकाणी ड्रोनचा हमखास वापर होतो. अनेकवेळा तर आंदोलन करतानाही ड्रोनचा उपयोग करण्यात येतो. देशाच्या सीमेवर आतंकी घटना घडल्यानंतर संपूर्ण सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली आहे. ड्रोनचा वापर करताना आता प्रत्येकांनाच खबरदारी घेण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. यामध्ये सार्वजनिक स्वरूपाच्या कार्यक्रमात ड्रोन वापरताना प्रथमत: त्याच्याकडे लायसन्स आहे का आणि त्याने परवानगी घेतली आहे का, याबाबतही जातीने चाैकशी होणार आहे. यामुळे पुढील काळात ड्रोन वापरताना पोलीस विभागाची परवानगी घ्यावी लागणार असल्याचे नव्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
ड्रोन उडवण्यासाठी लायसन हवे !
ड्रोन उडविण्यासाठी अलीकडे काही कठोर नियम करण्यात आले आहे.सार्वजनिक ठिकाणी वापर करताना ड्रोन उडविण्याचे लायसन्स सक्तीचे आहे.पोलीस प्रशासन या संपूर्ण बाबीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पार पाडते.
सार्वजनिक कार्यक्रमात ड्रोनला परवानगी आवश्यकअलीकडे छायाचित्रणामध्ये ड्रोनचा वापर वाढला आहे. सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेताना ड्रोनला पोलीस विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. पोलीस प्रशासन संपूर्ण बाबीची खबरदारी घेऊन परवानगी देते.- माधुरी बाविस्कर, उपविभागीय पोलीस अधिकारी
निवडणुकीच्या कार्यक्रमांमध्ये अथवा सभांमध्ये ड्रोन वापरला जातो. या मदतीने गर्दी कॅच करण्यात येते.
कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ड्रोनला पोलीस विभागाकडून परवानगी घ्यावी लागते.
अशा ड्राेनधारकांना ड्रोनच्या मदतीने चित्रिकरण करताना सार्वजनिक स्थळी प्रथमत: पोलीस विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे.
ड्रोन उडविण्यासाठी लायसन्सचीही आवश्यकता असते. यानंतरच अधिकृत ड्रोनधारक ड्रोनने फोटो काढू शकतात.
जिल्ह्यामध्ये हाैशी ड्रोनधारकांची संख्या मोठी आहे. मात्र, त्याची नोंद पोलीस दप्तरी निरंक आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलीस विभागामार्फत कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. याशिवाय दंडात्मक कारवाईही होते.
- साधारणत: एका कार्यक्रमात फोटो शूट करण्यासाठी कमीत कमी सहा हजार रुपये आकारले जातात.- कार्यक्रमाची रूपरेषा आणि कार्यक्रमाची भव्यता यावर ड्रोनच्या दराची निश्चिती होते.- कार्यक्रम मोठा असेल, सार्वजनिक स्वरूपाचा असेल तर २० हजारापर्यंतही खर्च जातो.