पुसद : काही दिवसांपासून दहा रुपयांचे नाणे बंद झाल्याची अफवा पसरली आहे. परिणामी दहा रुपयांची नाणी चलनात स्वीकारण्यास कुणीही तयार नाही. ही नाणी घेत नसेल तर अशा व्यावसायिकासह नागरिकांवर भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम १९३४ नुसार फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने ५०० व एक हजाराच्या नोटबंदी केल्यानंतर शेतकरी, शेतमजूर, छोटे व्यावसायिकांचे अतोनात हाल झाले. त्याची झळ अद्यापही काही प्रमाणात जाणवत आहे. आता दहा रुपयांची नाणे बाजारात कोणी घ्यावयास तयार नाही. वेगवेगळ्या डिझाईनची दहा रुपयांचे नाणे असल्याने कोणते असली व कोणते नकली हे कळत नसल्याने हे नाणे खोटे असल्याची अफवा पसरली आहे. मात्र दहा रुपयाची नाणी बंद झाल्याची ही केवळ अफवा असून नाणी चलनात स्वीकारणे प्रत्येकाला बंधनकारक आहे. जर कुणी व्यापारी अथवा धंदेवाईक नागरिकांकडून दहा रुपयाची नाणी स्वीकारत नसेल तर तो कायदेशीररित्या गुन्हा आहे. दहा रुपयांची नाणी न स्वीकारण्याविरुद्ध पोलिसात नागरिकांनी तक्रार करावी. देशातील अधिकृत चलन जर कुणी स्वीकारत नसेल तर त्याच्याविरुद्ध भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम १९३४ नुसार फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा प्रशासकीय आदेश आहे. सोशल नेटवर्कवर दहा रुपयाचे नाणे चलनातून रद्द करण्यात आल्याबाबत जर कुणी पोस्ट टाकत असेल तर अशा संबंधित ग्रुप अॅडमिनवर तसेच वैयक्तिक पोस्ट टाकून अफवांचा प्रसार करणाऱ्यांवरदेखील गुन्हा दाखल करण्याचा निर्णय आता प्रशासनाने घेतला आहे. (तालुका प्रतिनिधी)
दहाचे नाणे न स्वीकारल्यास गुन्हा दाखल होणार
By admin | Published: April 03, 2017 12:21 AM