अविनाश साबापुरे
यवतमाळ : पैसा फेकून टीईटी प्रमाणपत्र मिळविणाऱ्या शिक्षकांचे वेतन थांबविण्याचे आदेश आहेत. मात्र, त्यानंतरही काही शाळा ‘आपसी समझोता’ करून अशा शिक्षकांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याची शंका शिक्षण विभागाला आहे. त्यामुळे बोगस शिक्षकांची माहिती दडविण्याचा प्रयत्न कराल, तर तुमचाही पगार रोखण्याची कारवाई केली जाईल, असा गंभीर इशारा वेतन पथकाने दिला आहे.
२०१९ मधील टीईटी परीक्षेत तब्बल ८ हजार ७४७ उमेदवार गैरमार्गाने उत्तीर्ण झाल्याची यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केली. त्यातील जे शिक्षक या बोगस प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी करीत आहेत, त्यांचे वेतन ऑगस्टपासून थांबविण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले होते. तसेच याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल ३० दिवसांत सादर करण्याच्याही सूचना होती. ही ३० दिवसांची मुदत आता संपायला आली आहे, तरी अनेक शाळांनी याबाबतचा अहवाल सादर केलेला नाही. त्यामुळे काही शाळा अशा शिक्षकांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
वास्तविक संचालनालयाने यापूर्वीच शाळांकडून खातरजमा करून राज्यातील साडेचारशे बोगस शिक्षकांचे शालार्थ आयडी गोठविले आहे. मात्र त्यानंतरही काही शाळांनी शिक्षकांची नावे दडविल्याची शंका आहे. त्यामुळे यापुढे एखाद्या शिक्षकाचे टीईटी प्रमाणपत्र बोगस असूनही त्याचे नाव शालार्थमध्ये आढळले, तर शाळेवरच कारवाई केली जाणार आहे.
हमीपत्र सादर करा
यासंदर्भात येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी तथा वेतन पथक अधीक्षकांनी जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना सक्त आदेश बजावले आहेत. आपल्या शाळेत आता कोणीही बोगस शिक्षक नसल्याचे हमीपत्र सादर केल्याशिवाय ऑक्टोबर महिन्याचे वेतन देयकच सादर करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. यात दिरंगाई झाल्यास मुख्याध्यापकांवरच नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे बोगस टीईटीधारक शिक्षकाची माहिती लपविणे संपूर्ण शाळेच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.
आपल्या स्तरावरून या शिक्षकांचे वेतन थांबविण्याची कार्यवाही झालेली नाही. संचालनालयाने यापूर्वीच अशा शिक्षकांचे शालार्थ आयडी गोठविल्याने त्यांचे वेतन निघण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
- डाॅ. जयश्री राऊत, माध्यमिक शिक्षणाधिकारी