आॅनलाईन लोकमतयवतमाळ : यवतमाळ शहर व परिसरातील प्रमुख बडे सावकार अखेर पोलिसांच्या ‘रडार’वर आले आहेत. त्यांची व त्यांच्यासाठी वसुलीचे काम करणाऱ्या गुन्हेगारी सदस्यांची इत्यंभूत माहिती गोळा केली जात आहे. लवकरच या संबंधी कारवाईची दिशा निश्चित केली जाणार आहे.यवतमाळ शहर व परिसरात लहान-मोठे शेकडो सावकार आहेत. परंतु २५ ते ५० लाखांपासून कोट्यवधी रुपये कर्ज क्षणात उपलब्ध करून देणाऱ्या सावकारांची संख्या अवघी थोडी आहे. कुणी कापड व्यवसायाआड, कुणी हार्डवेअर, दारू, किराणा, धान्य, प्रॉपर्टी, बँकींग, सुवर्ण, हॉटेल, ट्रॅव्हल्स, बिल्डरशिप, बांधकाम कंत्राट, मेडिकल, वैद्यकीय, बॅटरी, फुटवेअर अशा वेगवेगळ्या व्यवसायाआड ही अवैध सावकारी खुलेआम सुरू आहे. अव्वाच्या सव्वा व्याजदर आकारणे, प्रॉपर्टी लिहून घेणे, अर्ध्या किंमतीत प्रॉपर्टी पचविणे, वसुलीसाठी गुंडांचा वापर हे प्रकारही अवैध सावकारीत नित्याचे झाले आहेत. वर्षानुवर्षे व्याज देऊनही मुद्दल फिटत नाही, हे या सावकारीतील भयानक वास्तव आहे. याच मुद्दलासाठी अनेकांना जीव गमवावा लागला. जीव गेलेल्यांच्या घटनेमागे अवैध सावकारी हे कारण पुढे येताच पोलिसांचा गेल्या काही महिन्यांपासून या अवैध सावकारांवर ‘वॉच’ आहे.‘लोकमत’च्या वृत्तमालिकेनंतर यवतमाळातील अवैध सावकारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे हे तमाम सावकार पोलिसांच्या ‘रडार’वर आले आहेत. प्रमुख बड्या सावकारांची ‘कुंडली’ बनविली जात आहे. त्यातूनच ‘दहा दिवसांचे दहा टक्के व्याज’ आकारले जात असल्याचे प्रकारही पुढे आले आहेत. वर्धा येथील बिल्डर व्यवसायातील दोघांची बंगलो व फ्लॅटची योजना अशीच चार-पाच कोटी रुपयात पचल्याचेही निदर्शनास आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपला या सावकारी व बीसी व्यावसायिकांवर वॉच आहे. त्यांना हात लावण्यापूर्वी तांत्रिक अडचणीही तपासल्या जात आहे. मात्र लवकरच या प्रकरणात ठोस कारवाई झालेली दिसेल, असे एका उच्चपदस्थ जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले. ‘लोकमत’च्या बातम्यांमुळेच अवैध सावकारांवरील कारवाईसाठी ‘कुंडली’ बनविण्याच्या कामाला गती आल्याचेही या अधिकाºयाने मान्य केले.नोटरी तपासा अन् पुरावे मिळवागेल्या काही वर्षात प्रॉपर्टीच्या झालेल्या नोटरी तपासल्यास खरे वास्तव पोलिसांपुढे उघड होण्यास वेळ लागणार नाही, एवढे निश्चित. कारण बहुतांश प्रॉपर्टीचे इसार पुढे सरकलेच नाही. व्यवहार फेल झाल्याचे त्यात दाखविले गेले तर ज्यांना कर्जाची रक्कम वेळेत चुकविता आली नाही, त्यांची संपत्ती अवैध सावकारांनी हडपली आहे. अशाच एका ‘हार्ड’ व्यवसायातून अलिकडेच एका वादग्रस्त संपत्तीचा ११ कोटीत व्यवहार झाला होता, हे विशेष.
अवैध सावकार अखेर पोलिसांच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 12:20 AM
यवतमाळ शहर व परिसरातील प्रमुख बडे सावकार अखेर पोलिसांच्या ‘रडार’वर आले आहेत. त्यांची व त्यांच्यासाठी वसुलीचे काम करणाऱ्या गुन्हेगारी सदस्यांची इत्यंभूत माहिती गोळा केली जात आहे.
ठळक मुद्देगुप्तपणे बनतेय ‘कुंडली’ : वसुलीतील गुन्हेगारी चेहऱ्यांवरही वॉच, वेगवेगळ्या व्यवसायाआड ‘व्याजाचे चक्र’