लोकमत न्यूज नेटवर्कवणी : गिट्टी खाणींनी व्यापलेल्या तालुक्यातील मोहदा येथे दोन हेक्टर ई क्लास शासकीय शेतजमीनीवर अवैधरीत्या मुरमाचे मोठ्या प्रमाणावर खनन केले जात असताना व याबाबत गावकऱ्यांनी महसूल विभागाकडे अनेकदा तक्रारी करूनही ठोस कारवाई केली जात नसल्याने वणीचा महसूल विभाग संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे.मंगळवारी गावकऱ्यांनी पुन्हा तिसऱ्यांदा या विषयात उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून आता काय कारवाई केली जाते, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. वणी तालुक्यातील मोहदा येथील गट क्रमांक ७५ या ई क्लास दोन हेक्टर शासकीय जमिनीतून गेल्या दोन महिन्यांपासून मुरूमाचे अवैधरीत्या खनन केले जात आहे. पोकलॅन्ड यंत्राद्वारे दररोज २५ ते ३० ट्रक मुरूम या जमिनीतून काढण्यात आला, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गंभीर बाब ही की, मोहदा येथील सरपंच गौतम सुराणा, चंद्रशेखर देठे व जे.बी.वर्मा या तिघांनी संगनमत करून तहसीलदारांची कोणतीही परवानगी न घेता या शासकीय जमिनीतून मुरूमाचे अवैधरित्या खनन केल्याचा आरोप गावकऱ्यांनी तक्रारीतून केला आहे. यासंदर्भात गावकऱ्यांनी पहिली तक्रार १ आॅगस्टला केली. त्यावेळी तहसीलदार रविंद्र जोगी यांनी गावकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. तक्रार करूनही कारवाई न झाल्याने गावकऱ्यांनी पुन्हा २० आॅगस्टला उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांच्याकडे तक्रार केली. त्याची गंभीर दखल घेत राऊत यांनी यासंदर्भात तहसीलदार जोगी यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. जोगी यांनी कारवाई करताना मात्र केवळ ३० ते ३५ फुटावरच खनन झाल्याचे दाखवून कारवाई केली, असा गावकऱ्यांचा आरोप आहे. २० आॅगस्टच्या तक्रारीनंतर खनन थांबविण्यात आले आहे. तक्रार झाली की, संबंधित तलाठी घटनास्थळावर जाऊन ग्रामस्थांसमोर थातूरमातूर पंचनामा करतो. पुन्हा परिस्थिती जैैसे थे होते, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तिसऱ्यांदा तक्रारभाजपाचे शहराध्यक्ष रवी बेलूरकर यांच्या नेतृत्वात मंगळवारी तिसऱ्यांदा एसडीओंकडे तक्रार करण्यात आली. यावेळी गावातील सचिन रासेकर, प्रविण बोंडे, गजानन शेलवडे, मंगेश ठावरी, किशोर जोगी, राहूल मेश्राम, स्वप्नील बोथले, ईश्वर झाडे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासकीय जमिनीतून अवैध खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 10:11 PM
गिट्टी खाणींनी व्यापलेल्या तालुक्यातील मोहदा येथे दोन हेक्टर ई क्लास शासकीय शेतजमीनीवर अवैधरीत्या मुरमाचे मोठ्या प्रमाणावर खनन केले जात असताना व याबाबत गावकऱ्यांनी महसूल विभागाकडे अनेकदा तक्रारी करूनही ठोस कारवाई केली जात नसल्याने वणीचा महसूल विभाग संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
ठळक मुद्देमोहदा येथील प्रकार : गावकऱ्यांच्या तक्रारी महसूल विभागाकडून बेदखल