लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना तपासणीचे बनावट निगेटिव्ह प्रमाणपत्र व त्याआधारे आंतरजिल्हा प्रवासासाठी बनावट ई-वाहतूक पास बनवून ३०० ते ५०० रुपयात विक्री करणाऱ्या आरोपी प्रतीक भड याला न्यायालयाने १७ मेपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, प्रतीक हा कळंब रोडवरील एका ढाब्यावर काम करीत होता व त्यातूनच त्याने लॉकडाऊन काळात दारू आणून घरातूनच त्याची विक्री सुरू केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. यवतमाळ शहरात बनावट ई-वाहतूक पासचा गोरखधंदा सुरू असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने स्टींग ऑपरेशन करून उघडकीस आणला. त्याआधारे सायबर गुन्हे शाखेने यातील मुख्य सूत्रधार प्रतीक भड याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याविरुद्ध अवधूतवाडी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली गेली. न्यायालयात उपस्थित केले गेले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपासादरम्यान अनेक गंभीर बाबी उघड झाल्या. गेल्या वर्षी सायबर गुन्हे शाखेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला काही वाहतूक पास जारी करण्यात आले होते. त्यातील ओरिजनल तीन पासची पीडीएफ एडिट करून प्रतीकने अनेक बनावट ई-पास व कोरोना निगेटिव्ह, पॉझिटिव्ह प्रमाणपत्र बनविले. पोलिसांनी त्याच्या मोबाइलमधून काही पास व प्रमाणपत्र जप्तही केल्या. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून आपण हे काम सुरू केले असून अवघ्या २० ते २५ पासच विकल्याचे प्रतीक पोलिसांना सांगत आहे. त्यात खरोखरच कितपत तथ्य आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. किरायाने घेतले सायबर सेंटरबहुतांश पास तो मोबाइलवरून करायचा. मात्र नेटवर्कची अडचण असेल तर तेव्हा तो आपल्या गोधनी रोड स्थित स्वस्तिक चौक परिसरातील सायबर सेंटरमधील डेस्कटॉपचा वापर करायचा. हे सायबर सेंटर त्याने भाड्याने घेतले आहे. हे सेंटर त्याच्या दिवंगत मित्राचे आहे. या सेंटरमधून तो फार्म भरून देणे, ऑनलाइन कामे करीत होता. परंतु लॉकडाऊनमुळे हे सायबर सेंटर बंद आहे. तेथील केवळ एक संगणक सुरू असल्याचेही पोलिसांच्या पाहणीत आढळून आले. आरोपीचा बनाव पोलिसांनी उधळलाप्रतीकच्या घरातून ३३ हजार रुपये किमतीची दारू पोलिसांनी जप्त केली. तेव्हा ही दारू स्वत:च्या वापरासाठी आणल्याचे त्याने सांगितले. परंतु नंतर त्याने ही दारू आपण लॉकडाऊन काळात घरूनच विकत असल्याचे कबूल केले. विशेष असे प्रतीकच्या घरून दारू नेणाऱ्यांमध्ये शहरातील अनेक प्रतिष्ठितांचा समावेश आहे. कळंब रोडवरील ढाब्यावर काम करायचा आरोपी- प्रतीक हा कळंब रोडवरील एका ढाब्यावरही काम करायचा. त्या कनेक्शनमधून प्रतीकने ही दारू आणली का, त्याचा नेमका पुरवठादार कोण, आणलेली ही दारू वैध की अवैध याचाही शोध पोलीस घेत आहेत. - प्रतीकच्या या बनावट ई-पास गोरखधंद्यात आतापर्यंत तरी इतर कुणाचा सहभाग नसल्याचे दिसून आले. मात्र कुणी तरी त्याच्या संपर्कात असावे असा संशय पोलिसांना आहे.