लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : तालुक्यातील रेती घाटांचे अद्याप लिलाव झाले नाही. दुसरीकडे पूस नदीसह विविध नदी-नाल्यातून रेतीचा अवैध उपसा जोरात सुरू आहे. याकडे प्रशासन बघ्याच्या भूमिकेतून पाहात आहे. त्यामुळे रेती तस्करांचे चांगभले होत आहे.दोन वर्षांपूर्वी पूस नदी पुनर्जीवन अभियान राबविण्यात आले. त्या माध्यमातून पूस नदी स्वच्छ करण्याचा शुभारंभ २ मे २०१८ रोजी हाती घेण्यात आला होता. तब्बल ४० दिवस नागरिकांच्या सहकार्याने हे स्वच्छता अभियान सुरू होते. त्यानंतर काही तांत्रिक अडचणींमुळे हा उपक्रम गेल्या दोन वर्षांपासून बंद पडला. नदी स्वच्छता अभियान राबविताना नदीपात्राचे रुंदीकरण करण्यात आले होते. यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे पूस नदीपात्रात दर्जेदार वाळूचा संचय झाला आहे. या दर्जेदार वाळूवर रेती तस्करांची वक्रदृष्टी पडली आहे.पूस नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा सुरू आहे. या वाळूची बेकायदेशीरपणे वाहतूक केली जात आहे. मात्र त्यावर प्रशासनातर्फे कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. विशेष म्हणजे दिवसाढवळ्या वाळू उपसा होत आहे. हीच अवैध वाळू मोठ्या वाहनांनी वाहून नेली जात आहे. मात्र या वाहतुकीला लगाम घालण्यात महसूल विभागाला अपयश आले आहे. त्यामुळे रेती तस्करांनी वाळूचा उपसा करण्यासाठी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. यातून रेती तस्कर गब्बर होत आहे. प्रशासनातर्फे रेतीची चोरटी वाहतूक थांबविण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे पूस नदी पात्रातील दर्जेदार रेती दिवसेंदिवस कमी होत आहे.सध्या शहर व तालुक्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. महसूल यंत्रणा उपाययोजना करण्यात व्यस्त आहे. रेती तस्करांनी हीच संधी साधली आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्याच नाकावर टिचून दिवसाढवळ्या वाळू उपसा केला जात आहे. या वाळू उपशाला लगाम लावण्याची गरज आहे. रेती तस्कर शासनाचा महसूलसुद्धा बुडवित आहे. त्यामुळे शासनाची रॉयल्टी बुडत आहे.टंचाईमुळे आले रेतीला सोन्याचे भावकोरोनामुळे बांधकाम ठप्प पडले होते. अनलॉक प्रक्रियेनंतर काही प्रमाणात बांधकाम सुरू झाले. मात्र गरजूंना रेती मिळत नाही. तस्कर चढ्या दराने रेतीची विक्री करतात. सध्या रेतीला सोन्याचे भाव आले आहे. दर वाढल्याने विविध योजनांचे घरकूल लाभार्थी मात्र हवालदिल झाले आहे. त्यांना सोन्याच्या दरातील रेती खरेदी करणे अवघड झाले आहे.
पुसद तालुक्यात नदी-नाल्यांच्या पात्रातून अवैध वाळू उपसा जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 5:00 AM
दोन वर्षांपूर्वी पूस नदी पुनर्जीवन अभियान राबविण्यात आले. त्या माध्यमातून पूस नदी स्वच्छ करण्याचा शुभारंभ २ मे २०१८ रोजी हाती घेण्यात आला होता. तब्बल ४० दिवस नागरिकांच्या सहकार्याने हे स्वच्छता अभियान सुरू होते. त्यानंतर काही तांत्रिक अडचणींमुळे हा उपक्रम गेल्या दोन वर्षांपासून बंद पडला. नदी स्वच्छता अभियान राबविताना नदीपात्राचे रुंदीकरण करण्यात आले होते.
ठळक मुद्देप्रशासन बघ्याच्या भूमिकेत । दिवसा वाहतूक, दर्जेदार रेती नष्ट होण्याच्या मार्गावर